रस्ता खचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
वाहनचालक व नागरिक हैराण
अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण-बदलापूर मार्गावर अंबरनाथ पश्चिम येथील लादी नाका परिसरात रस्ता खचल्याने भलामोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली असून, नागरिक या खड्ड्याला ‘ऐतिहासिक खड्डा’ म्हणत नागरिकांसह वाहनचालकही संताप व्यक्त करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत असलेल्या कल्याण-बदलापूर महामार्गावर लादीनाका परिसरात किसन सायकल मार्टच्या समोरच रस्ता खचल्याने भला मोठा खड्डा पडला आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच याच रस्त्यावर तुटलेले गतिरोधक आणि खराब रस्ता यामुळे अपघातांची मालिका वाढली. त्यातच आता हा रस्ता खचल्याने अनेकदा दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही. त्यामुळे तोल जाऊन भररस्त्यात पडण्याची भीती वाढली आहे.
अनेकदा दुचाकीस्वारांचा तोल जाऊन पडल्याचेही बोलले जात असून, जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. नेहमीची रहदारी असणाऱ्या या मार्गावर वाहनचालकांचे टायर, शॉकऑब्झर्बर, चाकांचे रीम्स वारंवार खराब होत आहेत. अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाताना दररोज सकाळी व संध्याकाळी येथे मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनाचे चाक येथे अडकताच पुढील वाहतूक थांबते, तर मागून येणारी वाहनेही अडखळतात. परिणामी वाहतूक धीमी होत असून, एका लेनवर कायम वाहतुकीचा खोळंबा होतो.
कामावर जायची सकाळची घाई असो वा संध्याकाळी थकलेल्या अवस्थेत घरी परतण्याची वेळ – खड्ड्यामुळे लागलेली वाहनांची रांग पाहून वाहनचालकांचा संताप अनावर होतो. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने संबंधित विभाग आता तरी लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाहनचालकांसह नागरिक त्रस्त
शाळा कॉलेज गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज उशीर होतो. पावसाळ्यात येथे पाणी साचल्याने धोका अधिकच वाढत आहे. रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहन या खड्ड्यांमुळे अडकतात, ज्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. तत्काळ हा खड्डा बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी. तसेच अपघात व वाहनांच्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करत आहेत.