वीज, पाणी बंद करू म्हणतात, आमच्या रोजीरोटीचे काय?
एल्फिन्स्टन पूलबाधितांचा प्रशासनाला सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : एल्फिन्स्टन पुलाच्या कामात बाधित होत असलेल्या इमारतीमध्ये चार पिढ्या आम्ही या ठिकाणी राहत आहोत. एकीकडे म्हाडा येऊन इमारत धोकादायक असल्याची नोटीस लावते. त्यानंतर बेस्ट वीजपुरवठा बंद करण्याची नोटीस लावते. कोणी येते आणि पाणीपुरवठा बंद करू असे सांगतात. वीज, पाणी बंद करू म्हणतात, पण आमच्या रोजीरोटीचे काय, असा सवाल एल्फिन्स्टन पुलाच्या कामात बाधित होत असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी केला आहे.
एल्फिन्स्टन पूल पाडकाम सुरू केल्यास पुन्हा आंदोलन करू, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मध्य मुंबईतील पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम जवळच्या इमारतींमधील रहिवाशांच्या आक्षेपांमुळे वारंवार पुढे ढकलण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी परिपत्रक काढून त्या अंतर्गत १० सप्टेंबरपासून एलफिन्स्टन पुलावरील वाहतूक बंद केली. पुन्हा एकदा या पाडकामाला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे पाडकाम पुढे ढकलले आहे.
ऑगस्टमध्ये महाराष्ट्र सरकारने पुलाच्या पाडण्यातून प्रभावित होणाऱ्या १९ इमारतींसाठी क्लस्टर पुनर्विकास योजना जाहीर केली. एल्फिन्स्टन पूल गजबजलेल्या प्रभादेवी आणि परळ या भागांना जोडतो. हा पूल प्रभादेवी आणि परळ या दोन रेल्वेस्थानकांवरून जातो. लाखो प्रवासी या पुलाचा दररोज वापर करतात.
हा पूल अनेक इमारतींनी वेढलेला आहे. काही दशके जुन्या इमारती असून, काही इमारतींमध्ये मुंबईतील काही भव्य कार्यालये आहेत. पुलापासून फार दूरवर रहिवासी इमारती आणि शाळा आहेत. तसेच टाटा मेमोरियल रुग्णालय, केईएम रुग्णालयासारखी प्रमुख रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये दररोज हजारो लोक येतात. त्यामुळे पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच हा पूल पाडा, अशी स्थानिकांची भूमिका आहे.
एल्फिन्स्टन पूल बंद करण्याबाबत रहिवाशांना कोणतीही नोटीस दिलेली नाही. प्रशासनाने आधी आमची व्यवस्था करावी, त्यानंतरच पूल बंद करावा. पुलाच्या कामाला आमचा विरोध नाही, परंतु एक किमीच्या परिसरातच आमचे पुनर्वसन करा. जोपर्यंत पुनर्वसन केले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही पुलाला हात लावू देणार नाही.
- राबिया ठाकूर, रहिवासी
एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील १९ इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार आहे. आम्ही प्रियदर्शनी टिळक भवन येथे घरे मागितली आहेत. आमचे पुनर्वसन करूनच इमारतीला हात लावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल.
- गीता वैद्य, रहिवासी
प्रियदर्शनी येथे पूर्वी ९० घरे उपलब्ध होती, आता तो आकडा ३२ वर आला आहे. प्रशासन आम्हाला तिकडे पाठवण्यासाठी दिरंगाई करत आहे. आमचे प्रियदर्शनी येथे पुनर्वसन करा, १० दिवसांत घरे खाली करू.
- मयूर लोके, स्थानिक रहिवासी
येथे लोकांचे व्यवसाय आहेत. मुलांच्या शाळा आहेत. लोकांचे कमावण्याचे साधन जास्त आहे. प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिले जाते, पण कृती होत नाही. इथल्या रहिवाशांच्या रोजीरोटीचा विचार केला जात नाही.
- सुहास बडदे, रहिवासी
माझे चनाविक्रीचे दुकान आहे. म्हाडाकडून इमारत अतिधोकादायक असल्याची नोटीस लावण्यात आली. त्यानंतर बेस्ट वीज बंद करणार म्हणते. आमचा धंदा आहे, त्याच्या जीवावर घर चालते. ते बंद केले, तर आम्ही खाणार काय? चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करायला हवे.
- माला गुप्ता, रहिवासी