महापालिकेची रुग्णालये स्वच्छतेत बेशिस्त
भटके श्वान, मांजरींचा वावर; दुर्गंधी, कचऱ्याचा रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम
मुंबई, ता. ११ ः कूपर रुग्णालयामध्ये उंदरांनी रुग्णांचा चावा घेतल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबई महापालिकेच्या इतर रुग्णालयांतील स्वच्छतेचा ‘सकाळ’ने आढावा घेतला. दररोज उपचारासाठी हजारो रुग्ण येत असलेल्या अनेक पालिका रुग्णालयांमध्ये कुत्रे, मांजरींचा मुक्त संचार दिसून आला. बहुतांश रुग्णालयांतील स्वच्छतागृहे साफसफाईअभावी दुर्गंधीयुक्त होती. बहुतांश रुग्णालयांत साफसफाई व्यवस्थित होत नसल्याचे समोर आले. भटके श्वान, मांजरींचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे अन्यथा एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता रुग्णांनी व्यक्त केली.
१. कूपर रुग्णालय
- रुग्णालय परिसरात दिवसा उंदीर, मांजरी दिसून आल्या नाहीत.
- उंदरांसाठी पिंजरे किंवा गमपॅड दिसून आले नाहीत.
- रुग्णांच्या नातलगांनी फेकलेला कचरा अधिक
- जिन्याच्या कडेला सर्वत्र थुंकीचे डाग, ओपीडी वॉर्डात कचरा
- सामान्य वॉर्डमध्ये अस्वच्छता
- स्वच्छतागृहे अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त
- डक्ट विभागातील गटारांमध्येही प्लॅस्टिकच्या बाटल्या व अन्य कचऱ्याचे साम्राज्य
- काही मजल्यावरील पीओपीच्या शीट्स कोसळलेल्या
स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड दुर्गंधी आहे. रुग्णालयात स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कर्मचारी तैनात करणे गरजेचे आहे.
- अश्विन मुरुगन, रुग्णाचा नातलग
२. कुर्ला भाभा रुग्णालय
- कुर्ला भाभा रुग्णालयाचे वॉर्ड चकाचक दिसत असले तरी अतिदक्षता विभागाबाहेर ड्रेनेजचे पाणी सातत्याने येत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
- चकचकीत लादीवर पाणी दिसत नसल्याने रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
- केसपेपर काढण्याच्या ठिकाणी पाणीगळती
- जिने, कोपरे, पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी माखले आहेत.
३. व्ही. एन. देसाई रुग्णालय
- रुग्णालयात स्वच्छता नीट राखली जात असली तरी मांजरांची दहशत कायम आहे.
- रुग्णांचे नातेवाईक मांजरांना उरलेले खाद्य देतात. यामुळे मांजरी तिथेच दिवसभर फिरत राहतात.
- ओपीडी व वॉर्ड स्वच्छ
४. केईएम रुग्णालय
केईम रुग्णालयात स्वच्छता बऱ्यापैकी आहे.
- केईएममधील ४, ४ ए या नवीन बांधलेल्या वॉर्डच्या शौचालयांत अस्वच्छता
- स्वच्छतेबाबत लक्ष देत नसल्याचे रुग्णांच्या तक्रारी
- वाॅर्डात दुर्गंधीचे प्रमाण जास्त असल्याने नातेवाईक आणि कर्मचारी मास्क वापरतात
- भटक्या कुत्र्यांचा वावर जास्त, वाॅर्डात मांजरी भटकतात.
५. शिवडी टीबी
- शिवडीतील टीबी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातच समूहाने कुत्री बसलेली असतात. भटकी कुत्री अंगावर धावून येतात. त्यामुळे परिचारिका व कर्मचारी, डॉक्टर, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यात भीतीचे वातावरण असते.
- रुग्णालय परिसर मोठा आणि मोकळा असल्यामुळे स्वच्छता बऱ्यापैकी आहे.
६. नायर रुग्णालय
- रुग्णालय व परिसरात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार
- इमारतीची डागडुजी सुरू असल्याने परिसरात अडगळ, टाकाऊ सामान
- घाणीचे प्रमाण वाढल्यास डास व उंदरांचा उपद्रव वाढून संसर्गजन्य रोगांचा धोका
मुख्य प्रवेशद्वारातून रुग्णालयाच्या आत जाणाऱ्या मार्गावरच जुने साहित्य टाकले असल्यामुळे येण्या-जाण्यास त्रास होतो. अडगळीतील सामानाची ठेच लागून माझ्या पायाला जखम झाली. प्रशासनाने लक्ष द्यावे.
- जैनुद्दीन शेख, रुग्णाचे नातेवाईक
७. सायन रुग्णालय
- लोकमान्य टिळक रुग्णालयात मांजरी व श्वानांचा वावर असल्याने रुग्णांना त्रास होतो.
- अपघात विभागाजवळील सार्वजनिक शौचालय दुर्गंधीयुक्त
- ओपीडी इमारतीच्या जिन्याखाली कचरा व दारूच्या बाटल्या पडलेल्या
- ओपीडी २३च्या वऱ्हांड्यात दुरुस्तीच्या कामामुळे सर्वत्र धूळ
- सर्व भिंती थुंकी, पिचकाऱ्यांनी रंगलेल्या
रुग्णालयाच्या आवारात कुत्रे, मांजरी सर्रासपणे फिरत आहेत. मांजरी रुग्णाच्या खाटेवर जातात. त्यामुळे चावा घेण्याची भीती वाटते.
- भागू बाई खरात, रुग्ण
८. कांदिवली शताब्दी रुग्णालय
रुग्णालयात स्वच्छता ठीक असली तरी सर्वत्र भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला आहे.
- केसपेपर खिडकीजवळ एसीचे पाणी
- रुग्णालयाबाहेर आणि आतमध्ये श्वानांचा वावर
- स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
- पहिल्या माळ्यावर कुत्रे फिरत असून, सुरक्षा रक्षक तैनात नाही.
९. वांद्रे पश्चिम, भाभा रुग्णालय
- मुंबई महापालिकेच्या वांद्रे पश्चिमेतील खुरशेदजी बेहरामजी भाभा रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण नुकतेच झाल्यामुळे रुग्णालय इमारत बऱ्यापैकी स्वच्छ ठेवली जात आहे.
-कुत्रे, मांजरींचा वावर दिसला नाही.
१०. जे. जे. रुग्णालय
- जे. जे. रुग्णालय परिसरातील अनेक ठिकाणी कचरा टाकलेला असून, त्यातून दुर्गंधी पसरली आहे.
- अनेक ठिकाणी थुंकून ठेवलेले आहे.
- रुग्णालय आवारात भटके श्वान आहेत.
- ठिकठिकाणी कचरा साचलेला, दुर्गंधीचे साम्राज्य
- रुग्ण व नातेवाइकांच्या आरोग्याला धोका
११. राजावाडी रुग्णालय
- राजावाडी रुग्णालयामध्ये बऱ्यापैकी स्वच्छता दिसून आली.
- भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक आहे.
पूर्वी परीक्षण विभाग व अतिक्रमण निर्मूलन यांची चौकी रुग्णालय परिसरात होती. या ठिकाणी साठलेल्या व कुजलेल्या वस्तूंमुळे कचरा, उंदीर, साप, मच्छरांचा त्रास वाढला होता. चौकी हटविल्यानंतर समस्या संपल्या.
- अजिंक्य वाणी, रुग्ण
१२. गोवंडीतील शताब्दी रुग्णालय
- रुग्णालय स्वच्छ असले तरी रुग्णालयाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे.
- वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.
- इतर कचरा रुग्णालयाच्या बाजूला व रुग्णालयातील कचरा कुंडीच्या बाहेर येतो.
- रुग्णांसोबत स्थानिक नागरिकांनाही त्रास
१३. लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र, धारावी
- रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा पेटी
- रुग्णालयात प्रवेश करतानाच दुर्गंधी
- अनेक दिवसांपासून राडारोडा पडून
- रुग्णालयात काही मजल्यांवर नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना धुळीचा त्रास
- रुग्णालयात काही ठिकाणी तुटलेले साहित्य अडगळीत पडले आहे.
प्रवेशद्वारावर कचरा व पावसाळ्यात पाणी जमा होते. त्याचा कायमचा बंदोबस्त पालिकेने करावा, यासाठी उपाययोजनांची गरज आहे.
- डॉ. सुनील चौधरी,
सहाय्यक अधिष्ठाता, छोटा सायन रुग्णालय
१४. सेंट जॉर्ज रुग्णालय
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगत असलेले शासकीय सेंट जॉर्ज रुग्णालय आणि परिसर स्वच्छतेच्या बाबतीत टापटीप असल्याचे चित्र आहे.
- दंत महाविद्यालय रुग्णालयाची मुख्य इमारत व इतर इमारतीची दुरुस्ती सुरू असल्याने त्या ठिकाणी रेती, विटा, सिमेंट आणि मातीच्या गोणींचे ढीग दिसून आले.
- रुग्णालयाबाहेरील खाऊ गल्लीमध्ये फेरीवाल्यांमुळे अस्वच्छता दिसून आली. मांजरी, श्वान परिसरात आढळून आले नाहीत.
गेल्या आठवडाभरापासून माझ्या पुतण्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या वॉर्डामध्ये दररोज कर्मचारी साफसफाई करतात. रुग्णालयाचा परिसरही स्वच्छ आहे.
- ओमप्रकाश यादव, रुग्णाचे नातेवाईक