कल्याण स्थानकात चोरीच्या वाढत्या घटना
डोंबिवली, ता. ११ : कल्याण रेल्वेस्थानकात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. मंगळवारी (ता. ९) दिवसभरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रवाशांकडून सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सोन्याची अंगठी आणि मोबाईल चोरीला गेल्याबद्दल लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी दीड वाजता एक प्रवासी कल्याण स्थानकातील स्कायवॉकवर लोकलची वाट पाहत उभा होता. त्या वेळी एक अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ येऊन मुंबईला जाणाऱ्या लोकलची माहिती विचारत संवाद साधू लागला. बोलता-बोलता त्याने आर्थिक अडचणीचे कारण देत प्रवाशाची समजूत घातली आणि संमोहनाच्या आधारे प्रवाशाची १० ग्रॅम सोन्याची अंगठी (६० हजार रुपये) लुबाडून पसार झाला. पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.
तशीच दुसरी घटना मंगळवारी सकाळी घडली. कल्याण स्थानकात एका प्रवाशाने बाजूला ठेवलेला १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल एका भुरट्या चोरट्याने चोरून नेला. हा प्रवासी बेसावध असताना चोरट्याने संधी साधली. याप्रकरणी उपनिरीक्षक मोहिते तपास करत आहेत.
प्रवाशांमध्ये वाढती अस्वस्थता
कल्याण हे अत्यंत गजबजलेले रेल्वेस्थानक असून, दररोज लाखो प्रवासी या स्थानकावर ये-जा करतात. पोलिसांची गस्त सुरू असली तरी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अनेक जण रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करत आहेत.