निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ११ : मासेमारी करताना चुकून राष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्यामुळे भारत-पाकिस्तानच्या समुद्री सुरक्षा यंत्रणांनी दोन्हीकडील मच्छीमारांना कैदी करून तुरुंगात ठेवले होते. दोन्ही देशांतील करारानुसार या मच्छीमारांसह अन्य कैद्यांचे राष्ट्रीयत्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानमधील ४८ मच्छीमारांसह इतर १९ कैद्यांना नुकतेच सोडले. अटारी-वाघामार्गे त्यांना पाकिस्तानला सोडण्यात आले. भारताच्या तुरुंगात अजूनही पाकिस्तानचे ३३ मच्छीमार आहेत; मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाकिस्तान तुरुंगात असलेले पालघर जिल्ह्यातील १८ खलाशी अजूनही पाकिस्तानने सोडलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
भारताच्या विविध राज्यांतील १९३ मच्छीमार पाकिस्तानच्या कराची मलीर तुरुंगात तुरुंगवास भोगत आहेत. तलासरी आणि डहाणू तालुक्यातील १८ मच्छीमारांचे भारतीय राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतरही पाकिस्तानच्या तुरुंगात ते मरणयातना भोगत आहेत. गेल्या वर्षी पालघरमधील विनोद लक्ष्मण कोल या खलाशाचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू, तर गुजरातमधील एका मच्छीमाराने आत्महत्या केली होती. या प्रकारामुळे तुरुंगात कारावास भोगत असलेल्या मच्छीमारांमध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण झाली, तसेच ते निराशेत आहेत. अनेकांची प्रकृतीही व्यवस्थित नाही. त्यामुळे त्यांना भारतात सोडण्याची मागणी वारंवार पुढे आली होती. मच्छीमार संघटना आणि शांततावादी कार्यकर्त्यांनी सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला आहे. भारताने पाकिस्तानातील मच्छीमारांसह इतर कैद्यांची सुटका केली आहे. आता पाकिस्ताननेही त्यांच्या ताब्यात असलेल्या मच्छीमारांची सुटका करावी, अशी प्रखर मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.
कराराचे उल्लंघन
भारत-पाकिस्तानच्या कॉन्सुलर एक्सेस कराराच्या कलम अथवा मुद्दा क्रमांक पाचनुसार कैदी किंवा बंदी केलेल्या मच्छीमारांचे राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतर त्यांना एका महिन्यामध्ये त्यांच्या मूळ राष्ट्रात सोडणे अपेक्षित आहे; मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाकिस्तानने भारतीय मच्छीमारांची सुटका केलेली नाही. त्यामुळे कराराचे उल्लंघन होत आहे. तुरुंगात असलेले भारतीय मच्छीमारांची आरोग्य अवस्था ठीक नाही. आता पाकिस्तानने पुढाकार घेऊन भारतीय मच्छीमारांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
मच्छीमारांच्या कुटुंबीयांची दैनावस्था
महाराष्ट्रातील १८ मच्छीमार खलाशी पाकिस्तान तुरुंगात दोन-चार वर्षांपासून कारावासात आहेत. या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना दैनंदिन गुजराण करणे जिकिरीचे बनले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून दर दिवशी ३०० रुपये कुटुंब मदत निधी देण्याचे जाहीर झाले होते. तुरुंगवास भोगलेल्या १८ मच्छीमारांच्या कुटुंबीयांसाठी ६४ लाखांचा मदतनिधी मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्रस्तावित करण्यात आला; मात्र त्यातील केवळ १६ लाख रुपये मंजूर झाले. तलासरी, डहाणू येथील १८ मच्छीमार खलाशी पाकिस्तानातील तुरुंगात खितपत पडले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची दैनावस्था झाली आहे. घरची कमावती व्यक्ती गेल्याने या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली असून भूक भागवण्यासाठी त्यांची वणवण होत आहे. घरातील महिलांना मोलमजुरी करून मूलबाळ व घरातील ज्येष्ठांना सांभाळण्याची वेळ ओढवली आहे.
चार वर्षांपासून जास्त काळ भारतातील मच्छीमार पाकिस्तान तुरुंगात खितपत पडून आहेत. पाच वर्षांपूर्वी सोडले जायचे; मात्र आता का सोडले जात नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तानी सरकारने माणुसकीच्या मूल्यांची जाण ठेवून मच्छीमारांना मायदेशी परत पाठवावे, अशी मागणी होत आहे.
- वेलजी मसानी, अध्यक्ष, अखिल भारतीय फिशरमन असोसिएशन
सरकारने आम्हा कुटुंबीयांना थोडीफार मदत केली असली तरी घरची स्थिती समाधानकारक नाही. मदतीपेक्षा आमचा माणूस परत आणण्यासाठी प्रयत्न करावा.
- गणपत बुजड, पाकिस्तानी तुरुंगातील मच्छीमाराचे नातेवाईक, असवाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.