माता रमाबाई आंबेडकरनगरात पालिकेची स्वच्छता मोहीम
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने मुंबई महापालिकेने स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे. याचाच भाग म्हणून घाटकोपर पूर्वेतील माता रमाबाई आंबेडकरनगरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेंतर्गत वसाहतीमधील ठिकठिकाणचा साचलेला कचरा जेसीबी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलण्यात आला. याअगोदर या भागात स्वच्छतेबाबत पालिकेच्या दुर्लक्षाच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत होत्या. पालिकेच्या या मोहिमेदरम्यान वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील साचलेला कचरा साफ करण्यात आला. तसेच प्रभातनगर येथील नव्याने उभारलेल्या अग्निशमन केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात पडलेल्या कचऱ्याचीही सफाई करण्यात आली. ही संपूर्ण मोहीम घाटकोपर एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी किरणसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेसाठी दोन डम्पर, एक जेसीबी आणि १० कामगार कार्यरत होते.
माता रमाबाई आंबेडकरनगर, कामराजनगर परिसरात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे आजार फैलावण्याचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून कामराजनगरकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील शहीद स्मारकाजवळ नागरिक आणि काही वेळेस पालिकेचे कर्मचारीही कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश परिसर रोगमुक्त ठेवण्याचा असून, आगामी काळातही ही स्वच्छता मोहीम सातत्याने राबवली जाणार असल्याची माहिती एन विभागाचे सहाय्यक अभियंता किरणसिंग पाटील यांनी दिली.