तीन हजार ६५९ अर्जदारांना घरपोच शासकीय सेवा
दाखले, फेरफार, प्रमाणपत्रे मिळवण्याची कटकट संपली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः जन्म-मृत्यूचे दाखले असो वा रहिवासी, अधिवास, चारित्र्य पडताळणी, जमिनीचा फेरफार किंवा जात वैधता प्रमाणपत्र, कोणत्या ना कोणत्या शासकीय कामासाठी जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागात खेटे न मारता तीन हजार ६५९ अर्जदारांना घरपोच सरकारी सेवा मिळाली आहे. घरपोच सेवा या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने ही किमया साध्य करून दाखवली आहे. सरकारच्या ८० विभागांच्या ४०२ सेवांचा लाभ जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून घरबसल्या मिळत असल्यामुळे अतिदुर्गम भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळत आहे.
नागरिकांना सेवा त्यांच्या दारातच सहज गतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने घरपोच सेवा हा उपक्रम सुरू केला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार हजार १३ अर्ज आले असून, तीन हजार ६५९ नागरिकांना घरपोच सेवा दिली आहे. उर्वरित १७० अपॉइंटमेंटवर काम सुरू असल्याबाबतची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.
प्रमुख सेवा व विभाग :
मृत्यू-जन्म दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना नं ८ चा दाखला (मालमत्ता फेरफार), निराधार योजनेसाठी वयाचा दाखला हे सर्व लोकहक्क सेवा आयोगांतर्गत येणारे हे सात दाखले घरपोच देण्यात येत आहेत.
जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उद्योग आधार, जीवन प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, पॅन कार्ड व दुरुस्ती, पासपोर्टसाठी शपथपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शेत मोजणी अर्ज, चारित्र्य पडताळणी, असे विविध प्रमाणपत्रही या उपक्रमांतर्गत झटपट दिले जात आहेत.
तिकीट आरक्षणापासून ते शाळा, परदेशी शिष्यवृत्ती, शासकीय वसतिगृह प्रवेश, अर्थ कुटुंब सहाय्य, नवीन कौटुंबिक शिधापत्रिका, महाभरती, नोकरीसाठी नोंदणीची सुविधाही या उपक्रमामुळे घरबसल्या शक्य झाले आहे.
महसूल, पोलिस आणि जिल्हा कार्यालयाशी संबंधित सेवा सुविधाही घरपोच केल्या जात आहेत.
केंद्रचालक घरी
घरपोच सरकारी सेवा पोहोचवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींच्या कार्यरत केंद्रचालक यांना दिली आहे. यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामधील केंद्रचालक नागरिकांकडून वेळ ठरवून त्यांच्या घरी येतात, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करतात आणि ऑनलाइन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात. सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोहोचवले जाते, मात्र त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक ८३८०८२२३३३ वर संपर्क साधून अर्जदारांना वेबसाईटवर नोंद करायची आहे.