शिवसेनेकडून समाधानकारक वाटा मिळणार : आनंदराज आंबेडकर
ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) ः आम्हाला महायुतीमधून नव्हे तर शिवसेना पक्षातून (शिंदे) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जागा सोडल्या जाणार आहेत. ठाणे पालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेकडून समाधानकारक वाटा मिळणार असल्याचे सूतोवाच रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. रिपाइं आठवले गटाच्या तिकिटावर निवडून आलेल्या माजी नगरसेवकाच्या पक्षप्रवेशाकरिता ते ठाण्यात आले होते. ठाकरे बंधूंचा ब्रॅण्ड बेस्टच्या निवडणुकीत संपला, अशी टीकादेखील उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर केली.
रिपब्लिकन सेनेने शिवसेना पक्षासोबत (एकनाथ शिंदे) युती केलेली आहे. ही युती आंबेडकरी नेत्यांना सत्तेत घेऊन जाण्याकरिता केली नसून, आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळावा यासाठी केली असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. शिवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे सत्तेपासून वंचित राहिलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्याला सन्मानाचा वाटा मिळणार आहे, असे सांगून शिवसेनेसोबत केलेल्या युतीला आंबेडकरी समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरात मोठ्या प्रमाणात गटातटात विखुरलेले कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेमध्ये सामील होत आहेत. या सगळ्यांना सोबत घेऊन रिपब्लिकन सेना त्यांना सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आले तरीही त्याचा महाराष्ट्रातील मतावर काही परिणाम होणार नाही. त्यांचा ब्रँड आता संपलेला आहे, हे नुकत्याच झालेल्या मुंबईतील बेस्टमधील निवडणुकीमधून दिसून आले, असेही आंबेडकर म्हणाले.
या वेळी रामभाऊ तायडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला. त्यांनी स्थापन केलेला दलित पॅंथर (आरटी) रिपब्लिकन सेनेमध्ये विलीन केली. या वेळी ठाणे जिल्हाध्यक्ष आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, अशोक बनसोडे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.