पाणीटंचाईच्या निषेधार्थ घालणार बंद जलकुंभांचे श्राद्ध
तब्बल १३ वर्षांपासून जलकुंभ धूळखात पाण्यासाठी दिवावासीय त्रस्त; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात १४ सप्टेंबर रोजी अनोखे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : दिवा शहरातील गंभीर पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त नागरिकांच्या वतीने ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. २०१२ च्या पूर्वीपासून बांधून तयार असलेले मात्र अद्याप कार्यान्वित न झालेले बेतवडे येथील दोन महाकाय जलकुंभ प्रशासनासाठी पांढरे हत्ती ठरले आहेत. प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी आता ठाकरे गट रविवारी (ता. १४) या बंद जलकुंभांचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन करणार आहे.
यासंदर्भात, ठाकरे गटाच्या महिला संघटक ज्योती राजकांत पाटील यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे आंदोलनाची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी दिवा शहरातील पाणी समस्येची दाहकता आणि प्रशासनाची उदासीनता याच्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. दिवा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने २०१२ पूर्वी बेतवडे येथे दोन विशाल जलकुंभांची उभारणी केली, मात्र तब्बल १३ वर्षे उलटली तरी हे जलकुंभ अद्याप सुरू झालेले नाहीत. या प्रकल्पावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. एकीकडे दिवा शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना, दुसरीकडे हे जलकुंभ केवळ शोभेची वास्तू म्हणून उभे आहेत. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा दाब असमान झाला असून, अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे, परंतु यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. महापालिका हे जलकुंभ का सुरू करू शकत नाही, याचे साधे स्पष्टीकरणही देण्यास तयार नाही. या निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असल्याचे म्हटले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि या पाणीटंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरेंच्या महिला आघाडीने थेट श्राद्ध घालण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनात शिवसेना विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर प्रमुख सचिन पाटील, युवा अधिकारी अभिषेक ठाकूर, विभाग संघटिका मयुरी पोरजी हे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती ज्योती पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.