वसई, ता. ११ (बातमीदार) : विविध कारणास्तव घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत, मात्र त्याची डोकेदुखी संपूर्ण कुटुंबाला होते. वसई-विरार मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जानेवारी ते जून कालावधीत ६११ महिला, तर ११० मुले व २९७ मुली मिळून १,०१८ जण हरवल्याची तक्रार विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासाची चक्रे फिरवत अनेक हरवलेल्या नागरिकांना शोधण्यास पोलिस आयुक्तालयाच्या पोलिसांना यश आले आहे.
स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये समाजमाध्यमांवर मैत्री, भेटण्याची आतुरता व प्रेम अशी त्रिसूत्री जुळते. त्यानंतर कोणालाही न सांगता घरातून पळून जाण्याचा बेत आखला जातो. काही जण हे घरात होणारी चिडचीड, मुक्त वातावरणात जगणे, मनासारखे वागणे, हट्टीपणा, मोबाईल वापरू न देणे, मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणे, अभ्यासावरून पालकांचा तगादा यासह अन्य कारणांवरून घर सोडून जातात, तर वैवाहिक जीवनात खटके उडणे, अन्य व्यक्तींशी प्रेमसंबंध, तर घरातून प्रेमाला होणारा विरोध पाहता घर सोडण्याचे प्रकारदेखील दिसून येत असतात. काही मानसिक आजारी रुग्ण स्मृतिभ्रंश झाल्याने त्यांना आपण कुठे जात आहोत, हे लक्षात येत नाही, परंतु अशा अनेक घटनांमुळे घरातील सदस्य हे काळजीत असतात. हरवलेली व्यक्ती सापडावी, म्हणून गल्लोगल्ली फिरून शोध घेतात व त्यानंतर पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावून तक्रार दाखल करतात.
पोलिसात तक्रार दाखल केल्यावर तपास करण्यास सुरुवात होते. हरवलेल्या व्यक्तीचे छायाचित्र, ठिकाण, संपूर्ण माहिती एकत्रित करत सीसीटीव्ही तपासणे, रेल्वे, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे, नातेवाईक, मित्र-मैत्रीण आदी मार्गाने शोध सुरू केला जातो. विचारपूस करून त्यानंतर हरवलेल्या व्यक्तीपर्यंत हा तपास येऊन थांबतो.
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सहा महिन्यांत एक हजार १८ महिला, अल्पवयीन मुले, मुली हरवल्या आहेत. यातील एकूण ८२६ जणांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले असून, अद्याप बेपत्ता असलेल्यांचा शोध सुरू आहे, मात्र यातील अनेक जण हे घरी परततात, परंतु सापडल्याची माहिती पोलिस ठाण्यात देत नाही, असे आढळून येते.
अल्पवयीन मुलींची संख्या अधिक
मिरा-भाईंदर वसई-विरार शहरातून हरवलेल्या मुलींची संख्या ही सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांत एकूण २९७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी २४९ पुन्हा माघारी परतल्या आहेत. अल्पवयीन मुली घर सोडून जात असल्याने ही चिंतेची बाब निर्माण झाली आहे.
जानेवारी ते जून २०२५
महिला मुले मुली
बेपत्ता ६११ ११० २९७
शोध पूर्ण ४७२ १०५ २४९
शोध सुरू २१९ ५ ४८
घर सोडण्याचे कारण :
- चिडचिड, संवादाची उणीव
- मित्रांची संगत
- अभ्यासाबाबत पालकांचा ओरडा
- मुक्त वातावरणात रममाण होणे
- पालकांचे पाल्याकडे दुर्लक्ष
- प्रेमाचे आकर्षण.
- विवाहासाठी असणारा विरोध.
- फिरण्याची आवड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.