कबुतरांना धान्य टाकण्याचे प्रमाण वाढले
आरोग्य धोक्यात, अपघातांची शक्यता; स्थानिकांकडून कारवाईची मागणी
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबईत कबुतरांना धान्य टाकण्याचे प्रकार वाढत असून, त्याचा थेट फटका नागरिकांचे आरोग्य आणि रस्ते सुरक्षेला बसत आहे. पालिकेने अनेक ठिकाणी धान्य न टाकण्याचे फलक लावूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
पामबीच रोड, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे तसेच रेल्वेस्थानक, एपीएमसी बाजारपेठ, मंदिर परिसर या ठिकाणी कबुतरांचे थवे सहज दिसून येत आहेत. इमारतीच्या टॅरेस, गृहसंकुल अशा परिसरात मोठ्या प्रमाणात कबुतरांचे थवे दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते कबुतरांच्या विष्ठेतून पसरलेल्या बुरशी आणि जीवाणूंमुळे अस्थमा, ब्राँकायटिस, न्यूमोनिया, हृदयविकार, त्वचारोग आणि डोळ्यांचे संसर्ग वाढतात. विष्ठेतील परजीवीमुळे लालसर पुरळ, खाज व ॲलर्जी होते. दम्याचे रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांमध्ये या आजारांचा धोका अधिक असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. त्यामुळे परिसरात कबुतरांचा वावर धोकादायक ठरत आहे. काही नागरिकांकडून तरीही कबुतरांना धान्य दिले जात आहे. विशेष म्हणजे महामार्गावरदेखील कबुतरांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पामबीच रोडवरील दोन पुलांवर दररोज शेकडो कबुतरे धान्यासाठी गोळा होतात. अचानक उडणाऱ्या थव्यांमुळे वाहनांना धडक बसते. मोटारसायकलस्वार गडबडीत तोल जाऊन पडतात, तर वाहनचालक पक्ष्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अपघातग्रस्त होतात. रोज काही पक्षी वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडतात.
..................
पालिका प्रशासनाची उपाययोजना
नवी मुंबई महापालिकेने शहरातील संवेदनशील ठिकाणांसह सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना धान्य टाकू नये, असे फलक व होर्डिंग्ज लावले आहेत; तरीही नागरिक या सूचनेकडे दुर्लक्ष करून कबुतरांना धान्य टाकतात. सामाजिक कार्यकर्ते विजय देशमुख यांनी पालिकेने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
...................
स्थानिकांचा आक्रोश
वाशीतील मिनी जुहू चौपाटी परिसरात कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे फिरायला येणाऱ्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी राहुल कदम यांनी केली.
................
वैद्यकीय इशारा
महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले, की कबुतरांच्या पिसांमधून व विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे श्वसनाचे आजार बळावतात. दम्याच्या रुग्णांना याचा विशेष फटका बसतो. म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी धान्य टाकणे टाळावे, असे त्यांनी आवाहन केले. नवी मुंबईतील कबुतरांची वाढती संख्या ही सामाजिक दयेपेक्षा आरोग्याचा धोका आणि अपघातांचे संकट ठरत असून, तातडीने प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.