कर्जतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन
३१ डिसेंबरपर्यंतच्या मूल्यांकनात अव्वल ग्रामपंचायतीला मिळणार १५ लाख
कर्जत, ता. ११ (बातमीदार) ः गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे कर्जत तालुक्यात उद्घाटन झाले आहे. हे अभियान यशस्वी करून जिल्ह्याला राज्यात अग्रेसर करण्याचा निर्धार गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
कर्जत पंचायत समिती कार्यालयात बुधवारी (ता. १०) आयोजित कार्यशाळेत या अभियानाची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती ग्रामपंचायतींसमोर ठेवण्यात आली. कार्यशाळेत आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिनिधी प्रसाद थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे, पाणीपुरवठा उपअभियंता अनिल मेटकरी, पशुधन विकास अधिकारी सचिन भोसले, गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे, गटविकास अधिकारी मितेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांनी अभियानाची माहिती दिली.
गाव समृद्ध झाले तरच राज्याचा विकास साधता येतो, या उद्देशाने १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबवले जाणार आहे. आवास योजना, ग्रामस्वच्छता, सुंदर शाळा उभारणी, महिला सुरक्षा, सीसीटीव्ही बसविणे, सौरऊर्जेचा वापर, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, रोजगार हमी, दिव्यांग सुविधा आणि पाणीपुरवठा अशा विविध क्षेत्रांत काम करण्यावर भर देण्यात आला आहे.
या अभियानाचे मूल्यांकन ११ जानेवारी २०२६ पर्यंत होणार असून, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे १५, १२ आणि आठ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. पारदर्शकतेसाठी बचतगट, मीडियाचा सहभाग आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सर्व ५५ ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन काम केल्यास कर्जत तालुका जिल्ह्यात क्रमांक एक ठरेल. गाव अधिक स्वच्छ, जलसमृद्ध आणि प्रगत करण्यासाठी सरपंच व ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुशांत पाटील यांनी केले. कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेतल्यास मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावोगावी विकासाची नवी दिशा ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.