डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांकरीता कार्यशाळा
पेण (वार्ताहर) : पेण येथील डॉ. पतंगराव कदम कला, वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या विद्यमाने स्पर्धा परीक्षा अंतर्गत स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल या विषयावर एक दिवसीय क्षमता संवर्धन कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी ता. १२ रोजी करण्यात आले होते. यावेळी पेण पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात स्पर्धा परीक्षा देत असताना, आपले जिद्द, चिकाटी तसेच स्वप्नांच्या दिशेने पुढे पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नशील राहणे आताच्या तरुणांना आवश्यक आहे. आपण पाहत असलेले कोणतेही स्वप्न मोठे नसते. त्याला पूर्ण करण्यासाठीची तयारी मोठी असावी लागते. त्यामुळे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे, असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एल. एन. कुमारे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणा देत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. बापूजी साळुंखे यांचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत व ती पूर्ण करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करावेत, असे सांगितले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ, डॉ. ए. जी. शेख, ग्रंथपाल मंगेश भित्रे आदी उपस्थित होते.
..............
पेण उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक कर्जांची माहिती
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अमृत या महाराष्ट्र शासनाची स्वायत्तता संस्था आयोजित खुल्या प्रवर्गातील ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, सिंधी, कच्ची, पाटीदार, राजपूत आदी प्रवर्गासाठी १४ सप्टेंबर रोजी अमृत मेळाव्याचे आयोजन पेण भाऊसाहेब नेने महाविद्यालय सभागृह येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते ॲड. बापूसाहेब नेने, बँक ऑफ इंडिया पेण शाखेचे मॅनेजर सौरभ पणशीकर उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक कर्ज यांच्या लाभ योजनांची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन संबंधित अधिकारी वर्गाकडून दिली जाणार आहे. हा मेळावा रायगड जिल्ह्यात पहिला असून याकरीता ॲड. मंगेश नेने ९९७५००७६००, अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे ९११२२२७८५९, अमित सामंत कोकण विभाग व्यवस्थापक ८२७५४५५४६५ तसेच महेश हेलवाडे पेण ब्राह्मण सभा ९७६४९०३५९८ यांच्याशी नागरीकांनी जास्तीत जास्त संपर्क साधून मेळाव्यास उपस्थिती दाखवावी असे निमंत्रक ॲड. मंगेश नेने यांनी केले आहे.
.................
शिक्षक दिनानिमित्त द. ग. तटकरे महाविद्यालयात शिक्षकांचा सत्कार
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सत्कार कार्यक्रम १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र गायकवाड (माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य व अशोकदादा साबळे विद्यालय समिती अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर, उपप्राचार्य डॉ. आर. एम. आचार्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुमैया अन्सारी यांची उपस्थिती लाभली होती. विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर शिष्यवृत्ती समितीचे प्रमुख प्रा. नेहा तुरई, अश्विन अंधेरी आणि महाविद्यालयातील युवा महोत्सवामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नरेंद्र गायकवाड व प्राचार्य डॉ. बी. एम. खमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी शेलार आणि प्रा. श्रावणी बक्कम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुमैया अन्सारी, सर्व सदस्य यांचा सहभाग होता तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
.................
भाऊसाहेब नेने महाविद्यालयात स्मृती व्याख्यानमाला
पेण (बातमीदार) ः भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब नेने यांच्या स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी केले होते. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त लष्कर अधिकारी मेजर मैत्रयी दांडेकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेलच्या प्रमुख तारा दीदी यांच्या हस्ते झाले. या व्याख्यानमध्ये महाविद्यालयाचे आधारस्तंभ व माजी अध्यक्ष बापूसाहेब नेने संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्राचार्य डॉ. सदानंद धारपसह विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, उपकार्य अध्यक्ष कडू इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच संस्थेच्या सदस्य डॉ. नीता कदम, विनायक गोखले उपस्थित होते. नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यानी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब नेने यांच्या सामाजिक कार्याचा व शैक्षणिक कार्याचे योगदानाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. त्यांचा शैक्षणिक वारसा आम्ही चालवत आहोत, असे स्पष्ट केले. त्यानंतर प्रमुख अतिथी मेजर मैत्रयी दांडेकर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपले लष्करातील अनुभव स्लाईड शोद्वारे दाखविले. विद्यार्थ्यांच्या शंकाचेही निरसन केले. तर आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
................
इंदापूर येथे अपघातग्रस्त दुकानांना आर्थिक मदत
माणगाव (वार्ताहर) ः इंदापूर येथे शनिवार ६ सप्टेंबर रोजी रात्री लागलेल्या आगीत तीन दुकाने व एक हॉटेल यांचे लाखोचे नुकसान झाले. या दुकानदार व हॉटेल चालकाला बुधवार १० सप्टेंबर रोजी मंत्री भरत गोगावले यांनी आर्थिक मदत केली. शाम कदम, अमित ओसवाल, पारसमल यांची तीन दुकाने तर बबलू जैसवाल यांचे हॉटेलचे खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे प्रत्येकी ५० हजार रुपये व किरकोळ नुकसान झालेल्या एका दुकानदारांना २५ हजार रुपये आर्थिक मदत दिली. इंदापूर येथे सहा सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता आग लागली होती. या आगीमध्ये दुकानांसह हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी स्थानिकांनी मध्यरात्री सर्व यंत्रणांना संपर्क करून आग आटोक्यात आणली. त्याच दिवशी दुपारी मंत्री भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट देऊन संकटग्रस्त दुकानदारांना धीर दिला.
....................
समीर शेडगे यांच्याकडून डायमंड शाळेला साहित्य भेट
रोहा (बातमीदार ) ः रोहा अष्टमी नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्याकडून अष्टमी येथील डायमंड एज्यूकेशन अँड वेल्फअर असोसिएशनच्या मेहबूब इंग्रजी शाळेला संगणक आणि प्रिंटर भेट स्वरूपात देण्यात आली. समीर शेडगे यांच्याकडून अष्टमी नगर पालिकेच्या शाळेला नेहमी सहकार्य केले जाते. या शाळेत समाजातील गरीब, वंचित नागरिकांची मुले शिक्षण घेतात. शाळेच्या कार्यकारिणीबरोबर समीर शेडगेदेखील सर्वांगीण उन्नतीसाठी झटत आहेत. त्यांनी केलेला सहकार्य अमूल्य असून कधी न विसरणारे कार्य आपल्या हातून घडत आहेत. याबद्दल डायमंड एज्युकेशन अँड वेल्फअर असोसिएशन संस्था आणि मुस्लिम समाज बांधव आपले आभारी राहतील, अशी प्रतिक्रिया समाजसेवक अरिफ पठाण यांनी दिली. या वेळी डायमंड संस्था अध्यक्ष समीर दर्जी, खजिनदार मुन्नवर पठाण, सचिव अफसर करजिकर, सदस्य इरफान दर्जी, यासिन पानसरे ,इम्तियाज दर्जी आदी जण उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.