दिव्यात बंद जलकुंभांचे ‘श्राद्ध’
पाणीटंचाईविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : दिवा शहरात पाणीटंचाईची समस्या वाढत असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. मागील १२ वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचे ‘श्राद्ध’ घालून महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी पाणी समस्या सोडवण्यास दबाव आणला, याशिवाय लवकरात लवकर प्रश्न न सुटल्यास ‘शोले स्टाइल’ आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
मागील १२ वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचे श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसैनिकांनी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा जाहीररित्या निषेध केला. तसेच पाणी समस्येकडे लक्ष वेधले, याशिवाय लवकरात लवकर पाणीप्रश्न न सुटल्यास ‘शोले स्टाइल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
दिवा शहरातील बेतवडे येथे १२ वर्षांपूर्वी बांधलेले दोन जलकुंभ आजतागायत बंद आहेत. यामुळे शहरातील अनेक भागांत असमान पाणी वितरण होते, शिवाय अनेक भागात पाणीटंचाई भेडसावत असते. याच विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर महिला जिल्हा संपर्कप्रमुख मृणाल यज्ञेश्वरी आणि महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर-राणे यांच्या सूचनेनुसार या आंदोलनाची योजना आखली. या आंदोलनात दिवा शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यात युवासेनेचे अभिषेक ठाकूर, उपशहरप्रमुख तेजस पोरजी, मारुती पडळकर, समन्वयक प्रियांका सावंत, उपशहर संघटिका स्मिता जाधव, उज्वला पाटील आणि शहर संघटक शनिदास पाटील आदींचा समावेश होता. याव्यतिरिक्त विभागप्रमुख, महिला विभाग संघटिका, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आदी महिला-पुरुष पदाधिकारी यांनी आंदोलनात मोलाचे योगदान दिले.
कार्यकर्त्यांनी केले मुंडन
महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचे ‘श्राद्ध’ घातले, तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि ‘अंतिम संस्कार’ करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या वेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. “जर या जलकुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता, तर ते कशाला बांधले? आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कोणाकडून वसूल करणार?” असे सवाल पाटील यांनी या वेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.