रासायनिक सांडपाण्याचा काळा धंदा उघड
अधिकृत तक्रार दाखल; सालवड ग्रामस्थांची धाडसी कारवाई
तारापूर, ता. १४ (बातमीदार) : बोईसरच्या सालवड गावाजवळ चालणारा रासायनिक सांडपाण्याचा काळा धंदा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. क्लोथवारी प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्लॉट नंबर डी १५ मधून येणारे रासायनिक पाणी एका टँकरमधून गुपचूप रस्त्यावर सोडण्यात येत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. तातडीने कारवाई करीत ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने टँकर पकडून बोईसर पोलिस ठाण्यात आणला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामस्थांनी हा प्रकार म्हणजे पर्यावरणाची हत्या असल्याचा आरोप केला आहे. अनेक वर्षांपासून चालत असलेल्या या कारभारामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि संपूर्ण पर्यावरण धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक माजी उपसरपंच कविता उमेश राऊत, उपसरपंच निखिल ठाकूर आणि सदस्यांनी स्वतः धाडस दाखवून १२ सप्टेंबरला मध्यरात्री हा टँकर पकडला. हा फक्त एका रात्रीचा प्रकार नाही, तर वर्षानुवर्षे सुरू असलेला विषारी खेळ आहे, असे कविता राऊत यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले, की कंपनीतून निघणारे सांडपाणी शेतजमिनींचे नुकसान करीत असून, गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. ही पिढीच नव्हे, तर पुढच्या पिढ्यांनादेखील याचा विषारी वारसा मिळेल. ग्रामस्थांनी आरोप केला आहे, की या अवैध कारवायांमुळे शेतीचे उत्पादन कमी झाले असून, लाखोंचे नुकसान होत आहे. विहिरी, नद्या आणि भूजलसाठे दूषित झाले आहेत. माशांचा संहार, पक्ष्यांचे गायब होणे आणि मातीची सुपीकता कमी होणे असे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
बोईसर हा औद्योगिक पट्टा असल्याने अशा घटना नवलाच्या राहिलेल्या नाहीत, मात्र ग्रामीण सालवड परिसरात प्रदूषणाचे थैमान थेट जीवघेणे ठरत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. आम्ही फक्त न्याय मागतो, असे सांगत ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापन व टँकरमालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, टँकर पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणात पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट
बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातील घातक केमिकल थेट शेतात सोडल्याने सालवड ग्रामपंचायतीमधील स्थानिकांनी रंगेहाथ टँकर पकडून पुढील कारवाईसाठी गावकऱ्यांनी टँकर पोलिसांच्या ताब्यात दिला.
- कविता राऊत, ग्रामपंचायत सदस्य, सालवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.