वज्रेश्वरी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात वाढते प्रदूषण व शहरीकरणामुळे काही खेडे व गावांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास दिसत आहे. सुकलेली झाडे, उत्खनन व वाढते प्रदूषण पशु-पक्ष्यांच्या निवाऱ्यावर घाला घालत आहे. नदीचे महापूर आणि अतिवृष्टीत झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक पक्षी, कीटक आणि इतर वन्यजीवांचा अधिवास व खाद्य नष्ट होत आहे. धीवर, तिबोटी खंड्या अशा पक्ष्यांना घरटी बांधताना अडचणी येत आहेत, असे निसर्ग व पशु-पक्षी अभ्यासकांनी नोंदवले आहे. याचा निसर्गचक्रावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
इमारत व घर बांधकाम, रस्ते व भरावासाठी दगड, खडी, मुरूम किंवा मातीचा उपयोग केला जातो. यासाठी डोंगर किंवा टेकड्या मोठ्या प्रमाणात पोखरल्या जातात. येथील ग्रामीण भागातून महामार्ग, राज्यमार्ग, अगदी अंतर्गत रस्त्यांवरून प्रवास करताना ठिकठिकाणी डोंगर व टेकड्या पोखरलेले दिसतात. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन दरड कोसळण्याचे, भूस्खलनाचे प्रकारही घडण्याची शक्यता निर्माण होते. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील निसर्ग अभ्यासक शिक्षक वैभव पवार यांनी यासंदर्भात नुकतेच सर्वेक्षण केले. उसगाव, दुगाड, मोहिली व परिसरात भटकंती करताना त्यांना अनेक ठिकाणी डोंगर पोखरलेले दिसले. मुरमाड किंवा मातकट टेकड्यांवर वर्षानुवर्षे झाडे तग धरून असतात. पावसाळ्यात या झाडांवर कावळे, कोतवाल, नारंगी-कस्तूर, नाचण, ठिपकेवाला होला असे वेगवेगळे पक्षी घरटी बांधतात, तर मुंग्या किंवा वाळवी झाडांच्या सान्निध्यात वास्तव्य करतात.
पावसाळ्यात पक्षी, कीटक, सरपटणारे जीव, खेकडे तसेच कीटक हे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असून पर्यावरण समृद्ध ठेवण्याचे व जैवविविधता टिकवण्याचे काम करतात. सद्यस्थितीत लोकसंख्या वाढीमुळे, विविध औद्योगिक वसाहती, परिसरात वाढते अतिक्रमण, गाव-खेड्याचे विद्रूपीकरण, नागरी वस्ती उभारताना मुरूम आणि मातीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने पशु-पक्ष्यांचा अधिवास व अन्न नष्ट होत आहे.
खोडाच्या आधारावर वास्तव्य
झाडांच्या खोडावरील सालीमध्ये अनेक कीटक अंडी देतात, तर मुळापाशी मुंग्या व वाळवी आपले वारूळ (घर) करून संपूर्ण पावसाळ्यात पुरेल एवढा अन्नसाठा करतात. यांच्याच जोडीला सरडे, पाली, साप, घोरपड आदी सरपटणारे जीव याच भागात अंडी देतात. तर विंचू, खेकडे, गोगलगाई, चोपई अशा प्रकारच्या जिवांचेही याच भागात वास्तव्य असते.
पांढऱ्या छातीचा धीवर (खंड्या) पक्षी, तिबोटी खंड्या, सामान्य धीवर पक्षी, नीलकर्ण किलकिला, तितर, खंड्या पक्षी मातीमध्ये बिळ तयार करून आपली घरटी तयार करून पिल्लांची वाढ करतात.
वाढते प्रदूषण, चोरटी वृक्षतोड, उत्खननामुळे जैवविविधता, पर्यावरण व निसर्गात अनेक बदल होत आहेत. त्यामुळे वेळीच योग्य व ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून येथील पशु-पक्षी सूक्ष्मजीव व निसर्ग चिरकाल टिकेल.
- वैभव पवार, पशु-पक्षी अभ्यासक, भिवाळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.