बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : बदलापूर पूर्वेकडील शकुंतला सोसायटीत २७ ऑगस्टला गणेशोत्सवाच्या दिवशी पाणीपुरवठा झाला. त्यानंतर मात्र, १९ दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाही. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी नागरिकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात घोषणाबाजी केली. वेळ पडल्यास मजीप्रावर मोर्चा नेण्याची तयारी या वेळी रहिवाशांनी दर्शवली आहे.
स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शंकुतला या सोसायटीत १८ सदनिका व नऊ दुकाने असून जवळपास १०० लोक राहतात. काही महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित होता. २७ ऑगस्टनंतर तर एकदाही पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रहिवाशांनी सोसायटीच्या पैशातून जलवाहिनी व पाण्याचे मीटर तपासून पाहिले. यात कोणताही तांत्रिक बिघाड नसतानाही पाणीपुरवठा बंद असल्याचे आढळले.
रहिवाशांनी वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात तक्रारी केल्या; सतत पत्रव्यवहारही केला. तरीदेखील समस्या सुटली नाही. पाणी नसल्याने लोकांना बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. “दररोज पाण्यासाठी पैसे घालणे आमच्यासाठी शक्य नाही. बाहेरचे पाणी वापरल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत,” असा संताप रहिवाशांनी व्यक्त केला. प्रशासनाकडून नेहमी उद्या तोडगा काढू असे सांगितले जाते; प्रत्यक्षात मात्र कोणीही येत नाही. त्यामुळेच आम्ही आज रस्त्यावर उतरलो, अशी व्यथा रहिवाशांनी मांडली. शकुंतला सोसायटीतील नागरिकांनी, आमचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा, अशी मागणी मजीप्राकडे केली आहे.
आम्हाला पाण्याचा त्रास तीन ते चार महिन्यांपासून होत आहे. मात्र गेले १९ दिवस एकही दिवस सोसायटीमध्ये पाणी आलेले नाही. आम्ही सामान्य घरातली लोक आहोत. रोज विकतचे पाणी आणायचे कुठून? वारंवार तक्रार करूनही मजीप्रा समस्येकडे लक्ष देत नाही.
- निमा चिंचवलकर, महिला रहिवासी
पाणी येत नसल्याने वारंवार मजीप्राच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना तक्रार दिली. सतत पत्रव्यवहारही केला आहे. या उपर आमदारांचे स्वीय सहाय्यकांची भेट घेऊन त्यांच्याकडेही तक्रार दिली. त्यांनीही मजीप्राच्या अधिकाऱ्यांना आमची समस्या सोडवायला सांगितले; मात्र अद्याप समस्या सुटलेली नाही. मजीप्राने दोन दिवसांत पाणी समस्या सोडवली नाही तर, सोसायटीधारक उग्र आंदोलन छेडतील.
- कुलदीप भोईर, रहिवासी
शकुंतला सोसायटीच्या शेजारी एका इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. हे काम सुरू करण्यावेळी खोदताना सोसायटीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, ही बाब काही दिवसांपूर्वीच लक्षात आली आहे. या संदर्भात संबंधित बांधकाम व्यावसायिकाला आम्ही खोदकामाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले साहित्य बाजूला करून देण्याची सूचना केली आहे. हे काम झाल्यानंतर लगेचच जलवाहिनी दुरुस्त करून सोसायटीमध्ये पाणीपुरवठा पूर्वपदावर येईल.
- सुरेश खाद्री, उपअभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
बदलापूर : शकुंतला सोसायटीतील रहिवाशांनी पाण्यासाठी मजीप्राच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.