नवी मुंबई विमानतळ ‘बर्ड-सेफ’ घोषित
पर्यावरणप्रेमींकडून पाणथळ संवर्धनाची मागणी
वाशी, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जलपक्ष्यांमुळे विमान सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले असून, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार जलपक्ष्यांचे उड्डाण साधारणपणे ५० मीटर उंचीपर्यंतच मर्यादित असते, तर विमानांचे उड्डाण आणि लँडिंग या उंचीपेक्षा बऱ्याच वर होत असल्याने विमान वाहतुकीस धोका नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘एनएमआयए’ने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेला (आयसीएओ) दिलेल्या माहितीत ‘बीएनएचएस’च्या निष्कर्षांचा उल्लेख केला असून, विमानतळ प्रशासनाने पक्षी आणि विमान दोघांच्याही सुरक्षेसाठी सविस्तर ‘वाइल्डलाइफ हॅझर्ड मॅनेजमेंट प्रोग्रॅम’ राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. या कामासाठी ‘बर्डगार्ड इंडिया’ या विशेष संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, ती विमानतळापासून १३ किलोमीटरच्या परिघात वर्षभर पक्ष्यांच्या हालचालींचा अभ्यास करत आहे. दरम्यान, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सरकारला डीपीएस फ्लेमिंगो तलाव तातडीने संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यासाठी शासकीय ठराव काढण्याचे आवाहन केले आहे. तसेच एनआरआय व टी. एस. चाणक्य यांसारखी भरती-ओहोटीवर आधारित जलचर क्षेत्रेही कायमस्वरूपी संरक्षित करावीत, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीस आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही पाठिंबा दिला आहे. बीएनएचएसने केलेल्या विस्तृत अभ्यासात लोटस लेक, बल्लाळेश्वर तलाव, खारघर व उलवे पाणथळ, ओवे व मोरबे धरण, गडेश्वर धरण तसेच पनवेल-बेलापूर खाडीचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. फ्लेमिंगो, बदकांच्या विविध प्रजाती, सॅंडपायपर, प्लोव्हर, गरुड, पतंग यांसारखे पक्षी येथे आढळतात, तर उन्हाळ्यात टर्न, बी-ईटर्स, श्राईक्स, स्विफ्ट्स यांसारख्या काही प्रजाती प्रजननासाठी येथे दाखल होतात.
नुकसान होण्याची भीती
पर्यावरणप्रेमींच्या मते, या सर्व पाणथळ अशी अधिकृत अधिसूचना न दिल्यास विकासकामांच्या नावाखाली त्यांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य पर्यावरण विभागाने तातडीने ठोस पावले उचलून नवी मुंबईतील जलचर क्षेत्रांचे संरक्षण करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.