अष्टमी नाक्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा कानाडोळा; नागरिक त्रस्त, अपघातांची मालिका
रोहा, ता. १५ (बातमीदार) : रोहा-नागोठणे मुख्य मार्गावरील अष्टमी नाका हा ग्रामीण भागाशी जोडणारा एकमेव प्रवेशद्वार मानला जातो, मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून या महत्त्वाच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हे ओळखणे कठीण झाले आहे.
अष्टमी नाक्यापासून खारपटी, पडम नाक्यापर्यंत खड्ड्यांची साखळी तयार झाली आहे. या खड्ड्यांतून वाहने वळवण्याच्या नादात अनेक अपघात घडले असून, काहींना जीव गमवावा लागला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, आता तरी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जागे व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे. गणपती उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर गावोगावी जाणाऱ्या प्रवाशांना या रस्त्याचा वापर करावा लागत होता. अशा वेळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास दुप्पट झाला. वाहने बंद पडणे, अपघात होणे, प्रवासाचा वेळ वाढणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील दवाखान्यांमध्ये आणतानादेखील विलंब होतो, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. अनेकदा प्रसारमाध्यमांतून बातम्या झळकल्या, नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या; तरीही दुरुस्तीच्या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. परिणामी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि रेल्वे प्रवासी या सर्वांचे हाल होत आहेत.
.......................
आंदोलनाचा इशारा
अष्टमी नाका हा रोहा नगरपालिकेचा प्रवेशद्वार असून, येथे रस्त्यांची अशी अवस्था असणे लज्जास्पद आहे. लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत विकासाचे गोडवे गायले, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. जनतेचे जीव धोक्यात घालून राजकारण करण्याऐवजी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि टिकाऊ दर्जेदार रस्त्यांची उभारणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. यापुढे आणखी एखादी दुर्दैवी घटना घडण्याआधी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा उद्रेक अनिवार्य ठरेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.