खड्डे चुकवण्याची शर्यत
वसई-विरार शहरांची अवस्था, प्रवासात विघ्न
प्रसाद जोशी ः सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १५ ः वसई-विरार शहरातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी पूर्ववत होतील, असे पालिकेने जाहीर केले, मात्र नवरात्रोत्सव जवळ आला तरी अजूनही रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे कोसळणाऱ्या पावसाबरोबर खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागत आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर मूलभूत सुविधा गरजेच्या आहेत, मात्र करोडो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याने पावसाळ्यात प्रवास धोकादायक झाला आहे. वसई पूर्वतील वालीव, सातिवली, निर्मळ, भुईगाव-वसई मार्ग, सोपारा विरार मार्ग, माणिकपूर, पेल्हार, संतोष भुवन, महामार्गाकडे जाणारा एव्हरशाईन, वसंत नगरी मार्ग, गावराईपाडा यासह अनेक प्रमुख रस्ते नादुरुस्त आहेत. त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला असून, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर मातांना रोजच खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
---------------------
वाहनांची घसरगुंडी
वसई-विरार महापालिका क्षेत्रात प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गावर खड्डे पडले आहेत. पावसाळी उपायोजना म्हणून दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी निधी खर्च केला जातो. त्यातून डांबरीकरण, खड्डे बुजवणे अशा कामांसाठी निधी वापरला जातो. यंदाही काम करण्यात आले असले तरी खड्ड्यांची संख्या कमी झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे प्रवासादरम्यान वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.
--------------
सणासुदीच्या आनंदावर विरजण
दहीहंडी, गणेशोत्सवात खड्डेमय रस्त्यांवरून भाविकांना प्रवास करावा लागला. आजही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात रस्ते दुरुस्त होणार की खड्ड्यातून प्रवास करावा लागेल, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.