महापालिका निवडणूक लढण्यास काँग्रेस सज्ज
विरार, ता. १५ (बातमीदार) : आगामी महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली असून, काँग्रेसनेही याबाबत आपली तयारी करण्यासाठी पक्षाचे नव्याने निवडून आलेल्या जिल्हा सदस्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार (ता. १६) सप्टेंबरला काँग्रेस भवन पारनाका वसई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी पालिका व पालघर जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चारचा करण्यात येणार आहे.
वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मासिक सभा तसेच नव्याने नियुक्त झालेल्या नवीन जिल्हा प्रभारी विधानसभा प्रभारी ह्यांचे स्वागत करण्यात येणार असून, निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सभेचे आयोजन केले आहे. आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असून, वसई तालुक्याच्या इतिहासातील एक वेगळाच निकाल देणारी निवडणूक असणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले जनआंदोलन आणि वोट चोरीचा प्रश्न जनतेला १०० टक्के पटला असून, लोकशाही वाचवण्यासाठी तसेच शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढणार आहे. या बैठकीला सर्व काँग्रेसप्रेमी, कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक ह्यांना ह्या महत्त्वाच्या सभेसाठी हजर राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा ह्यांनी केले आहे.