सायन रेल्वेस्थानकासमोरील रस्ता मोकळा
धारावी, ता. १५ (बातमीदार) : सायन रेल्वेस्थानकासमोरील वाहतूक पूल नूतनीकरणासाठी एक वर्षापूर्वी तोडण्यात आल्याने धारावीतून सायनच्या दिशेला जाण्यासाठी संत रोहिदास मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच स्थानकातून बाहेर पडल्यावर जाण्यासाठी असलेल्या दुपदरी मार्गातील एका पदरावर पुलाचे काम चालू असल्याने मार्गाच्या एकाच पदराचा वापर प्रवाशांना व पादचाऱ्यांना करता येत आहे. खुल्या मार्गावर टॅक्सी व रिक्षाचालक रस्ता अडवून ठेवतात. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळे पार करत मार्ग काढावा लागत होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’च्या रविवारच्या (ता. १४) अंकात प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत रस्ता मोकळा केला आहे.
अनेकदा टॅक्सी व रिक्षाचालक ग्राहक भेटेपर्यंत रस्त्यातून आपले वाहन हलवत नाहीत. या बेशिस्तीमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यातही लहान विद्यार्थी, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरून चालताना जास्त त्रास सहन करावा लागत होता. त्यात दुचाकी रस्त्यावर उभ्या असल्याने या समस्येत भर पडत होती. रस्त्यावरून चालणारे पादचारी व वाहनचालकांचे वाद वाढत चालले होते. त्यामुळे संताप व्यक्त होत होता. ही बाब वाहतूक विभागाच्या निदर्शनास आणूूनही मार्ग निघत नसल्याचे मनसेचे शाखाध्यक्ष संदीप कदम यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.