सेवा रस्ता कायम ठेवण्याची १० सोसायट्यांची मागणी
ठाणे, ता. १५ : ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अपघातांची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. अशातच दुसरीकडे सेवा रस्त्याचा मुख्य रस्त्यात समावेश करण्याच्या कामाविरोधात १० सोसायट्यांमधील रहिवासी एकत्र आले आहेत. हिरानंदानी १ संकुलातील क्लब हाउसमध्ये या रहिवाशांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रस्ता हा कायमस्वरूपी मुख्य रस्त्यात समाविष्ट करण्याच्या कामाला घोडबंदर रोडवरील रहिवाशांचा तीव्र विरोध होत आहे. या कामाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी हिरानंदानी १ पार्क संकुलासह विविध १० संकुलांमधील पदाधिकारी व रहिवासीही एकत्र आले आहेत. या बैठकीला भाजपचे आमदार संजय केळकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत सेवा रस्त्याची आवश्यकता रहिवाशांकडून मांडण्यात आली, तर मुख्य रस्त्यावरून भरधाव वाहने सुरू झाल्यानंतर छोट्या वाहनांच्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ता कायम ठेवावा. त्याचबरोबर या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद करावी, अशी आग्रही मागणीही बैठकीत करण्यात आली.
दरम्यान, घोडबंदर रोडवरील गृहसंकुलांनी सेवा रस्ता कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रहिवाशांच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच भेट घेतली जाईल, असे आश्वासन आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिले.