अकरा हजारांचा मोबाईल लंपास
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पुण्याला जाण्यासाठी गाडी नसल्याने ठाणे रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ च्या बुकिंग हॉल येथे बसलेल्या उत्तर प्रदेश येथील रिझवान अन्सारी (१९) याला डुलकी लागली. तीच डुलकी त्याला ११ हजार ५०० रुपयांना पडली असून, चोरट्याने त्यांचा मोबाईल लांबवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश येथील रिझवान हा पुणे स्वारगेट बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या एका पावभाजी ढाब्यावर काम करतो. गुरुवार (ता. ११) पुण्याला जाण्यासाठी उत्तर प्रदेश ते ठाणे असा प्रवास करून रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ठाण्यात उतरला. पण पुण्याला जाण्यासाठी पहाटे गाडी असल्याने तो फलाट क्रमांक १ ला लागून असलेल्या तिकीट बुकिंग हॉल येथे जाऊन बसला. प्रवासात दमल्याने त्याला बसल्या जागी झोप लागली. त्या वेळी त्याने मोबाईल फोन पँटच्या खिशात ठेवला होता. सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास जाग आल्यावर मोबाईल फोन मिळून आला नाही. म्हणून ११ हजार पाचशे रुपयांचा मोबाईल फोन कोणीतरी चोरी केल्याचे तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.