मुंबई

मोनोरेलच्या बिघाडाची मालिका सुरूच!

CD

पुन्हा एकदा मोनोरेल बंद!
बिघाडाची मालिका सुरूच; उच्चस्तरिय बैठकीनंतरही सुरळीत धावेना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मोनोरेलच्या बिघाडाची मालिका सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास चेंबूरच्या दिशेने जाणारी मोनोरेल अँटॉप हिल आणि जीटीबी नगर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. वारंवार होणाऱ्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर, एमएमआरडीए आणि एमएमओसीएलच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजना करण्याचे निश्चित झाले होते; मात्र त्यानंतरही मोनोतील बिघाड सुरूच असल्याने मोनोरेल बंद करायची की सुरू ठेवायची, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईकरांना वेगवान प्रवास करता यावा, म्हणून राज्य सरकारने दहा वर्षांपूर्वी अडीच हजार कोटी रुपये खर्चून मोनोरेल प्रकल्प उभारण्यात आला; मात्र सुरुवातीपासून त्यामागे बिघाडाचे ग्रहण लागले आहे. त्यातून सुटका व्हावी, मुंबईकरांना अखंडित सेवा देता यावी, म्हणून एमएमआरडीएचे आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मोनोरेलचे एकूण आयुर्मान आणि परिवहन क्षमता पाहता, प्रत्येक गाडीत प्रवासीसंख्या मर्यादा ठेवणे, सुरक्षा कर्मचारी तैनात करणे, मोनो पायलटसह तंत्रज्ञ पाठवणे, सर्व गाड्यांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच नव्या गाड्या सेवेत दाखल करण्याचाही निर्णय घेतला होता; मात्र त्यानंतरही मोनोरेलमधील बिघाडाची मालिका सुरूच असल्याचे सोमवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले.
---------
नेमका बिघाड काय झाला?
संत गाडगे महाराज चौक येथून चेंबूरच्या दिशेने जाणारी मोनोरेल सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास अँटाॅप हिल आणि जीटीबी नगर स्थानकादरम्यान अचानक बंद पडली. त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्याही खोळंबल्या. त्याबाबत माहिती मिळताच, मोनोरेलच्या सुरक्षा पथकाने तात्पुरत्या लोखंडी जीन्याच्या मदतीने दुसऱ्या गाडीत १७ प्रवाशांची सुटका केली; मात्र यामुळे मोनोची सेवा जवळपास दोन तास विस्कळित झाली. ऐन गर्दीवेळीच्या झालेल्या बिघाडामुळे सर्वच स्थानकात प्रवासी अडकून पडले होते.
-----
हायड्राॅलिक ब्रेक निकामी?
मोनोरेलला हायड्राॅलिक ब्रेक प्रणाली आहे. त्यातील दाब कमी झाल्याने मोनोचा ब्रेक लागत नव्हता. त्यामुळे गाडी पुढे नेसल्यास अपघात होण्याची भीती असते. त्यामुळे पार्किंग ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली होती, अशी माहिती मोनोरेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
----
आतापर्यंत झालेले बिघाड
२१ ऑगस्ट २०२५ - वीज पुरवठा खंडित झाल्याने अर्धा तास सेवा ठप्प
१९ ऑगस्ट २०२५ - ओव्हरलोडमुळे चेंबूर-भक्तीपार्क दरम्यान सेवा बंद; गाडीच्या काचा फोडून २०० लोकांची सुटका केली
सप्टेंबर २०१९ - म्हैसूर काॅलनीत तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलचा खोळंबा
नोव्हेंबर २०१७ - म्हैसूर काॅलनी स्थानकात मोनोरेलचे दोन डबे जळून खाक
ऑगस्ट २०१६ - चेंबूर स्थानकात मोनोरेलच्या डब्याला आग
मार्च २०१५ - वीजपुरवठा खंडित झाल्याने मोनोरेल अडकल्याने प्रवाशांची लटकंती
----
मुंबईतील विशिष्ट भागातील रिअल इस्टेटचे दर वाढवण्यासाठी तत्कालीन सरकारने मुंबईकरांच्या माथी हा प्रकल्प मारला. सुरूवातीपासूनच मोनोला अल्प प्रतिसाद मिळत आहे. सुटे भाग मिळत नसल्याने सातत्याने बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत.
- संतोष दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते
----
मोनोरेलचे सातत्याने होत असलेले बिघाड पाहता ती आता बंद करणे योग्य होईल असे वाटते. नेहमीच बिघाड होत असल्याने त्याची विश्वासार्हता कमी होत आहे. त्यामुळे पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवा.
- गाॅडफ्रे पिमेंटा, वाहतूक तज्ज्ञ
----
मुंबईची गरज पाहता मोनोरेलसारखे तकलादू वाहतूकीचे साधन येथे यशस्वी होऊच शकत नाही. त्याचे परिणाम आता मुंबईकर भोगत आहे. मोनोरेलची सेवा मोठे पार्क, विमानतळ अशा ठिकाणी असायला हवी.
- डाॅ. शंकर विश्वनाथ, वाहतूक तज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT