भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रारुप प्रभागरचनेवर अवघ्या ४६ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींवर बुधवारी (ता. १७) सुनावणी घेण्यात येणार आहे.
मिरा-भाईंदरच्या प्रारुप प्रभागरचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर सर्वांच्या माहितीसाठी ती ३ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारुप प्रभागरचनेवर १५ सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात सोमवारपर्यंत (ता. १५) सुमारे ४६ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत, मात्र यातील काही प्रभागांच्या हद्दींवर, तर काही प्रभाग व सदस्य संख्येवर हरकती नोंदविण्यात आल्या. या हरकतींवर बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सुनावणी होणार आहे. सुनावणी अधिकारी म्हणून उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती केली आहे.
कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना झालेली नाही. परिणामी सध्या तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेसाठी २०११ च्या जनगणनेनुसार मिरा-भाईंदरची लोकसंख्या आठ लाख नऊ हजार गृहित धरण्यात आली आहे. वास्तविक मिरा-भाईंदर शहराची सद्यस्थितीतील लोकसंख्या १५ लाखांच्या आसपास झाली आहे. त्यामुळे प्रभाग रचना तयार करताना ही लोकसंख्या गृहित धरणे आवश्यक असून प्रभागांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येनुसार सदस्यसंख्या ९५ एवढी न ठेवता ती वाढविणे आवश्यक आहे, असे हरकतींमध्ये नमूद केले आहे.
काँग्रेसकडूनही प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला आहे. प्रभाग रचना ही २०२४ च्या मतदार नोंदणी व लोकसंख्येवर आधारित हवी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यासंदर्भात काँग्रेसने राज्य निवडणूक आयोग, मुख्य सचिव नगरविकास खाते, तसेच पालिका आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवले आहेत.
नगरसेवक वाढवण्याची गरज
१९९१ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या एक लाख ७५ हजार ६०५ होती, तेव्हा नगरसेवकसंख्या ६७ होती. २००१ मध्ये लोकसंख्या पाच लाख २० हजार ३८८ झाल्याने नगरसेवकांची संख्या वाढून ९५ करण्यात आली. आताही नगरसेवक संख्या ९५ कायम ठेवण्यात आली आहे. ती वाढविण्याची गरज आहे. तसेच २०२४ च्या मतदार नोंदणीनुसार नव्याने प्रभाग रचना होणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रभाग हा साधारणपणे ३० ते ३५ हजार लोकसंख्येचा असावा, आदी मुद्दे आक्षेपात नोंदविण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.