जव्हार, ता. १६ (बातमीदार) : डोंगरदऱ्या, घनदाट जंगल भाग असा भूभाग लाभलेल्या जव्हार तालुक्यात विद्यार्थीदशेतच झाडावर चढणे, पोहणे, धावणे यासारख्या क्रिया बालवयातच घडत असतात, शिवाय येथील पोषक वातावरण येथील नागरिकांना बलशाली बनवित आहे. अशातच खाकी वर्दी पोलिस होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या युवांच्या आशा या राज्य सरकारने केलेल्या पोलिस भरतीच्या घोषणेने पल्लवित झाल्या आहेत.
राज्यात पोलिस भरतीची अधिकृत प्रक्रिया सुरू होण्याची घोषणा होताच, जव्हार शहर व ग्रामीण भागातील तरुणाईत उत्साह निर्माण झाला आहे. येथील युवक पहाटेपासूनच मैदानावर सराव करताना दिसत आहेत. धावणे, लांब उडी, पुशअप्स, तसेच शारीरिक तंदुरुस्ती वाढवणारे व्यायाम हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. राज्य सरकारकडून राज्यात लवकरच पोलिस भरती केली जाणार असल्याची घोषणा करताच सरकारी नोकरी मिळण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली असल्यामुळे पोलिस दलात भरती होऊन देशाची व समाजाची सेवा करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहत आहेत. त्यासाठी दिवस-रात्र तयारी करताना दिसत आहेत. यात मुलींचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे.
अनेक मुली स्वतंत्रपणे धावणे, व्यायामाचे प्रशिक्षण घेणे, तसेच शारीरिक कसोटीची तयारी करत आहेत. मुले सराव करीत असताना पालकही त्यांना आधार देत असून, अनेक पालक स्वतः सकाळी मुलांसोबत मैदानावर येऊन त्यांना प्रोत्साहन देतात. प्रशिक्षण केंद्रामध्ये तरुणांची गर्दी झाली आहे. पोलिस भरतीला सुरुवात झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज, शारीरिक कसोटी, लेखी परीक्षा या टप्प्यांनुसार प्रक्रिया पार पडणार आहे. सरकारकडून अनेक दिवसांनंतर पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे यंदाच्या पोलिस भरतीमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येईल.
अन्य पदांचीही भरती करावी!
सरकारने आरक्षणाबाबतचा निर्णय तातडीने घेऊन पोलिस भरतीसोबतच इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी. अनेक गोर-गरीब कुटुंबातील तरुण दिवस-रात्र सराव करीत असल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, असे रवींद्र गवते या तरुणाने सांगितले.
सरावाला वेग
पोलिस भरतीसोबतच वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे अनेक तरुण सध्या सराव करीत आहेत. भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टीचे त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असे प्रशिक्षक शैलेश पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.