ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव
कर्मचाऱ्यांवर आरोग्यसेवेचा अतिरिक्त ताण; रुग्णांना गैरसोयींचा सामना
तलासरी, ता. १६ (बातमीदार) : तलासरी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या तलासरी ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. येथील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर आरोग्यसेवेचा अतिरिक्त ताण आहे. संसर्गजन्य आजारासह बाह्य रुग्णसेवा आंतररुग्णसेवा प्राणीदंश, सर्पदंश, साथजन्य आजार आ इतर आजारांच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांची दमछाक होत आहे.
तलासरी हा मोठा तालुका असल्याने ग्रामीण दुर्गम भागातील रुग्ण या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. विशेषतः गरोदर मातांना हे रुग्णालय वरदान ठरत असले तरी या रुग्णालयात भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची कमतरता आहे. एखाद्या मातेची प्रसूती करायची झाल्यास बाहेरून स्त्रीरोगतज्ज्ञ मागवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर ओढवत आहे. त्यातच मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ एकच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध आहे. त्यामुळे या रुग्णालयात आरोग्यसेवेसाठी कर्मचारीवर्गासह इतर सुविधांची आवश्यकता अधोरेखित होत आहे. रुग्णालयात भूलतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, शल्यचिकित्सक (सर्जन) आणि इतर तज्ज्ञ डॉक्ट उपलब्ध नसल्याने रुग्णालयाची परिस्थिती गंभीर आहे. सध्या फक्त तीन एमबीबीएस कंत्राटी डॉक्टर्स कार्यरत असून, त्यांच्याकडे कोणतीही विशेष तज्ज्ञ म्हणून पदवी नाही. तज्ज्ञ सेवेसाठी दुसऱ्या रुग्णालयांमधून आठवड्यातून ठरावीक दिवशीच डॉक्टर उपलब्ध करून दिले जातात. इतर दिवशी रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते. सध्याच्या स्थितीत रुग्णालयात दंत सल्लागार गट-अ : १, वैद्यकीय अधिकारी : १, कनिष्ठ लिपिक : १, प्रशासकीय पदे : २, सफाईगार अशी पदे रिक्त असून, यामुळे रुग्णालयात अडचण निर्माण होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
रुग्णांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष
या रुग्णालयात दररोज २०० ते ३०० रुग्ण नियमित तपासणीसाठी येत आहेत. विशेष आजार असलेल्या रुग्णांसाठी तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्यांना गुजरात किंवा मुंबईकडे उपचारासाठी फरपट करीत जावे लागते. एकीकडे आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असताना दुसरीकडे याच राज्याच्या ग्रामीण भागातील तलासरीसारख्या तालुक्यात रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नाही. त्यामुळे रुग्णांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते व इतर डॉक्टर शोधण्यात या रुग्णांसह रुग्णालय प्रशासनाचीही दमछाक होत आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रभार असल्यामुळे त्यांना काही दिवस तिथे जावे लागते. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
चौकट
रुग्णालयाची सध्याची सुविधा
दररोज बाह्यरुग्ण तपासणी : १५०-२०० रुग्ण, रुग्णवाहिका : ४ (यापैकी १ नादुरुस्त), एक्स-रे तपासणी दररोज ८-१० रुग्ण, ईसीजी दररोज १५-२० रुग्ण, रक्तगट तपासणी व लसीकरण सेवा नियमित, शस्त्रक्रिया कक्ष कार्यरत असून, प्रसूतीशी संबंधित शस्त्रक्रिया नियमित, मनोरुग्णतज्ज्ञ दर गुरुवारी (८-१० रुग्ण तपासणी), नेत्रतपासणी आठवड्यातून दोन दिवस अशा प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. भविष्यात रुग्णालयासाठी १० एकर जागा उपलब्ध असून, जिल्ह्यातील सर्वाधिक जागा असलेले हे सरकारी रुग्णालय आहे. पुढील काळात १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची योजना असून, निधी मिळाल्यानंतर काम सुरू होणार आहे.
कोट
सध्या रुग्णालय कमी साधनसंपत्ती असूनही सर्व विभाग सुरळीतपणे कार्यरत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या झाल्यास रुग्णांना आणखी चांगली सेवा देता येईल. जागा उपलब्ध असून निधीअभावी नवे सुसज्ज रुग्णालय उभारले गेले नाही. निधी मिळाल्यास तलासरी रुग्णालय आदिवासी भागातील नागरिकांसाठी मोठा आधार ठरेल. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी तलासरी ग्रामीण रुग्णालय महत्त्वाचे केंद्र आहे, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि निधीअभावी मोठ्या प्रमाणावर अडचणी जाणवत आहेत.
- डॉ. प्रभाकर भोये, ग्रामीण रुग्णालय, तलासरी
कोट
रुग्णालयात सर्व विभागांत सुरळीत रुग्णसेवा असून, या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याकारणाने आठवड्यातून केवळ एकदा तज्ज्ञ डॉक्टर एकदिवसीय रोग निदानासाठी उपलब्ध होत असल्याने गैरसोय होत आहे. जर सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर व अत्यावश्यक सुसज्ज इमारत रुग्णालयास उपलब्ध असती तर रुग्णांच्या सेवेत अजून भर पडली असती व सर्व प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध रोगांवर निदान करण्यात रुग्णांच्या सोयीत भर पडली असती.
- शैलेश तांबडा, रुग्ण, धानोरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.