बेकायदा बांधकामांना अभय
गावठाणातील वाढीव बांधकामांची नोंदणी सुरू, सिडकोचा दुजाभाव
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील गावठाणातील विनापरवानगी बांधकाम असणाऱ्या घरांची नोंदणी प्रक्रिया सिडकोच्या आदेशानुसार दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे एकीकडे घर नोंदणीतून मिळणारा कोट्यवधींचा महसूल ठप्प झाला आहे, तर दुसरीकडे नवी मुंबईतील सिडकोने स्वतः विकसित केलेल्या वसाहतीमधील विनापरवानगी बांधकाम असणाऱ्या घरांची नोंदणी सुरू ठेवल्याने एकाच शहरात बांधकामाबाबतचा हा दुजाभाव बेकायदा बांधकामांसाठी निमित्त ठरत आहे.
नवी मुंबई महापालिका हद्दीतील गावठाणात ग्रामस्थांनी स्वतःच्या मालकीच्या जुन्या घरांवर गरजेनुसार विनापरवानगी बांधकामे केली आहेत. जुन्या घरांच्या जागांवर चार ते पाच मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. आर्थिक गरजेनुसार काही ग्रामस्थांना ही घरे विकावी लागत आहेत, तर काही लोक घरे गरजेसाठी विकत घेत आहेत. मात्र ही घरे विकताना दोन वर्षांपासून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण ६ जून २०२३ पासून नवी मुंबईतील गावठाणातील विनापरवानगी घरांची नोंदणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे विकली जात असली तरी त्यांची नोंदणी मात्र होत नाही. त्यामुळे सिडकोच्या वतीने दुय्यम निबंधकांना पत्र पाठवून गावठाणातील विनापरवानगी घरांची नोंदणी बंद ठेवण्याबाबत सूचना दिली जात आहे. सिडकोने गावठाणाबाबत ही भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे सिडको इमारतींचे विनापरवानगी बांधकामांच्या घरांची नोंदणी उघडपणे सुरू आहे. त्यामुळे स्वतःचे पाप लपवण्यासाठी विनापरवानगी बांधकामांना एकही नोटीस बजावण्यात आली नसल्याने सिडकोच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
-----------------------------
प्रकल्पग्रस्तांमध्ये अन्यायाची भावना
सिडकोच्या वतीने नवी मुंबईत दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैराणे, वाशी, जुईनगर, सानपाडा, नेरूळ, सीबीडी बेलापूर, खारघर, उलवे, पनवेल, तळोजा येथे रो हाऊस, एसएस टाइप, जेएनवन, जेएनटू, बीवन, बीटू टाइप तसेच अन्य इमारती उभारल्या आहेत. येथे विनापरवानगी बांधकामे झालेली आहेत.
- महापालिकेने या बांधकामांना नोटिसा बजावताना कारवाईचे संकेत दिले आहेत. अशा इमारतींमधील घरांची हस्तांतरण, नोंदणी प्रक्रिया बिनदिक्कत सुरू आहे. इमारतींच्या विनापरवानगी बांधकामांबाबत कोणत्याही प्रकारचे पत्र काढले जात नसल्याने मूळ ग्रामस्थांवर सिडकोकडून अन्याय असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहे.
-----------------------------
आंदोलनाचा इशारा
गावठाण, सिडको वसाहतीमधील दुजाभावाविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद खळे यांनी सहा महिन्यांपूर्वी सिडकोसमोर उपोषण केले होते. त्या वेळी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर निर्णय घेण्यात आला नाही. गावठाणातील विनापरवानगी घरांची नोंदणी बंदच ठेवण्याच्या सूचना सिडको काढत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-------------------------------
नवी मुंबई शहराच्या विकासासाठी नवी मुंबईतील ग्रामस्थांच्या शेतजमिनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संपादित केल्या आहेत. परंतु ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांच्या मूळ घरांबाबत ग्रामसेवक, तहसीलदार, प्रांत, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी केलेला ठराव, आदेश शासन दरबारी अथवा सिडको दरबारी उपलब्ध नाही. तसेच मूळ गावठाणे सिडकोच्या अखत्यारीत होती तर अत्यावश्यक सोईसुविधा, विद्युत, जल, सांडपाणी, आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र गावठाणांबाबत तसे झाले नाही.
- रोशन एम. चव्हाण, वकील उच्च न्यायालय, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.