नोटा बदलण्याचा बहाणा करून साडेचार लाखांना लुटले
पळालेल्या मुख्य आरोपीस अटक; तिघांचा शोध सुरू
अंधेरी, ता. १७ (बातमीदार) ः नोटा बदलण्याचा बहाणा करून बोरिवली रेल्वेस्थानकात आलेल्या एका व्यक्तीकडील साडेचार लाखांची रोकड पळवणाऱ्या आरोपीस बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली.
यशवंत ऊर्फ ओमकार आश्विन मंचेकर असे या आरोपीचे नाव असून, याच गुन्ह्यात तो सध्या पोलिस कोठडीत आहे. या गुन्ह्यात इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गणेश सुभाषचंद्र सिसोदिया हे भाईंदरचे रहिवासी असून, त्यांचा चलन विनिमयाचा व्यवसाय आहे. ग्राहकांकडून आलेल्या फाटलेल्या जुन्या नोटा, चलनात बंद झालेल्या रिझर्व्ह बँकेला देऊन त्याऐवजी दुसऱ्या नोटा घेऊन ग्राहकांना देण्याचे काम आहे.
या कामासाठी ते ग्राहकांकडून १० ते १५ टक्के कमिशन घेतात. या कामात त्यांचे काही परिचित एजंट असून, त्यांच्याकडूनही त्यांना अनेकदा काम मिळते. त्यासाठी ते संबंधित एजंटला काही कमिशन देतात. ८ सप्टेंबरला त्यांच्या परिचित मनोज नावाच्या एका एजंटने त्यांना संपर्क साधून ओमकार मंचेकर या व्यक्तीकडे दोन हजार रुपयांच्या सात लाखांच्या साडेतीनशे नोटा आहेत. त्या नोटा बदलून हव्या आहेत, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला १५ टक्के कमिशन घेऊन उर्वरित नवीन नोटा देण्याचे आश्वासन दिले होते. या वेळी त्याने त्यांना बोरिवलीतील गोरा गांधी हॉटेल येथे भेटण्यास बोलावले होते.
९ सप्टेंबरला सकाळी ते मनोजसोबत गोरा गांधी हॉटेलजवळ आले होते. या वेळी त्यांनी ओमकारला कॉल केला, मात्र तो त्याचे आजोबा हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगून आला नाही. त्यानंतर त्यांनी ११ सप्टेंबरला भेटण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे गणेश सिसोदिया हे बोरिवलीतील फलाट क्रमांक एकवर आले होते. या वेळी त्यांनी ओमकारला देण्यासाठी सहा लाख रुपये आणले होते. त्यापैकी साडेचार लाख एका बॅगेत तर दुसऱ्या बॅगेत दीड लाख ठेवले होते. फलाट क्रमांक एकवर ते ओमकारची वाट पाहात होते. सायंकाळी ४ वाजता तिथे ओमकार आला. याचदरम्यान तिथे काही तरुण आले. त्यांनी त्यांच्याकडे पाहून इशारा केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच गणेश सिसोदिया हे पळू लागले. ते लोकलमध्ये चढले असता त्यांच्या मागून ते तिघेही आले आणि त्यांनी त्यांच्याकडील एक बॅग घेऊन पलायन केले. या बॅगेत साडेचार लाखांची रोकड होती. दीड लाखांची रोकड सोडून ते चौघेही साडेचार लाखांची रोकड घेऊन पळून गेले होते. या घटनेनंतर ओमकार मंचेकर हादेखील पळून गेला होता. त्यानेच इतर सहकाऱ्याच्या मदतीने ही लूटमार केल्याचा संशय व्यक्त करून गणेश सिसोदिया यांनी बोरिवली रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.