सेवा पंधरवड्यानिमित्त फेरफार अदालत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : नागरिकांची फेरफारशी संबंधित कामे वेळेत आणि पारदर्शकपणे व्हावीत, यासाठी ठाणे नगर भूमापन विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत येणाऱ्या सेवा पंधरवड्यानिमित्त सामान्य जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने फेरफार अदालत आयोजित करण्यात येणार आहे. या अदालतीअंतर्गत नागरिकांना त्यांच्या मिळकतीसंदर्भात माहिती आणि फेरफारसंदर्भात नवीन प्रणालीबाबत अद्ययावत माहिती देऊन त्यांच्या नोंदीसंदर्भात तक्रारी दूर करण्याच्या दृष्टीने ही अदालत उपयुक्त ठरणार आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात नगर भूमापन विभागाशी संबंधित अनेक कामे मिळकतींच्या नोंदीसंदर्भात भूमी अभिलेख विभागाने इप्सित वेब पोर्टल निर्माण केले असून, त्यावर खरेदी नोंद, वारस नोंद, बोजा कमी करणे, बोजा चढवणे, हक्क सोड अशा वेगवेगळ्या फेरफार नोंदीबाबत घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना त्यांच्या फेरफारसंबंधी अर्ज दाखल करता येणार आहे. तर नागरिकांची फेरफारशी संबंधित कामे वेळेत आणि पारदर्शकपणे व्हावीत, यासाठी ठाणे नगर भूमापन विभागाने महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असून, २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत फेरफार अदालत घेण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील आणि नगर भूमापन अधिकारी सिद्धेश्वर घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर भूमापन कार्यालय, जुपिटर हॉस्पिटलजवळ पार्किंग प्लाझा, ७वा मजला येथे होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवडा राज्यभर साजरा होणार आहे. या कालावधीत प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान पद्धतीने काम करणार आहे. या सेवा पंधरवड्याअंतर्गत फेरफार अदालत यशस्वी करण्यासाठी नागरिकांनीदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नगर भूमापन कार्यालय, ठाणे यांनी केले आहे.