श्रीलंकेत तिसरा न्येलेनी ग्लोबल फोरम उत्साहात
विरार, ता. १८ (बातमीदार) : तिसरा न्येलेनी ग्लोबल फोरम नुकताच श्रीलंकेतील कॅंडी या शहरात उत्साहात झाला. यात १०२ देशांमधून ७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि विशेष म्हणजे यांपैकी ६० टक्के प्रतिनिधी महिला होत्या. शेतकरी संघटनांची जागतिक संस्था ‘ला व्हिया कॅम्पेसिना’ ही या राष्ट्रीय सहकारी विकास संस्थेच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये भरलेल्या जागतिक फोरमच्या मुख्य आयोजकांपैकी एक होती.
या परिषदेचे घोषवाक्य होते ‘आमूलाग्र परिवर्तन - आज किंवा कधीच नाही.’ अनेक जण हजर असलेल्या २००४मध्ये मुंबईत झालेल्या वर्ल्ड सोशल फोरमच्या ‘पर्यायी जग शक्य आहे’ या घोषवाक्याची आठवण झाली. या जागतिक परिषदेसाठी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत, बीकेयूचे राष्ट्रीय सरचिटणीस युद्धवीर सिंग आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे या भारतातील शेतकरी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. कर्नाटक राज्य रयत संघमच्या अध्यक्षीय मंडळाच्या सदस्या सुश्री चुक्की नंजुंडस्वामी या फोरमच्या आशियाखंडातील मुख्य आयोजकांपैकी एक होत्या. हे चौघेही संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम)चे नेते आहेत आणि त्यांनी या परिषदेत विविध मुद्द्यांवर भाषणे केली.