बालमृत्यूविरोधातील लढ्याला बळ
तुर्भेत कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : कुपोषित बालकांचे मृत्यूदर रोखण्यासाठी, बालकांना नवजीवनदान देण्यासाठी पोषण तुर्भे येथे पुनर्वसन केंद्र उपयुक्त ठरू लागले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू झालेले पहिलेच केंद्र आहे.
नवी मुंबई शहरात ४८ पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या अनेकांना पोटभर जेवणासाठी धडपड करावी लागते. गर्भ अवस्थेतील अनेक महिलांना पोषक आहार मिळत नसल्याने जन्माला येणारे बाळ निरोगी होईल, याची शाश्वती नसते. त्यामुळे विविध व्याधींनी ग्रासलेल्या बालकाचा अनेकवेळा जन्मानंतर मृत्यू होतो. त्यामुळे कुपोषणाविरोधातील लढ्याला बळ देण्यासाठी पालिकेने २०२५/२६ च्या अर्थसंकल्पात तुर्भे येथे माता-बाल रुग्णालयात पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची तरतूद केली आहे.
-------------------------------------------
केंद्राचे फायदे
- महापालिकेची चार सार्वजनिक रुग्णालये, दोन माता बाल रुग्णालये व २४ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. येथे गरोदर महिलांच्या सर्व रक्त तपासण्या, सोनोग्राफी, औषधे पूर्णपणे मोफत दिली जातात. नैसर्गिक बाळंतपण किंवा सिझर विनामूल्य होते.
- गरोदर मातांना बाल कुपोषित किंवा कमजोर होऊ नये, म्हणून औषधे फुकट दिली जातात, पण आरोग्य सुविधेतील पोषण पुनर्वसन केंद्रामुळे गंभीर, तीव्र कुपोषित मुलांच्या पौष्टिक आहारासह उपचारात्मक काळजी घेणे सहज होणार आहे.
----------------------------
बेघरांसाठी उपयुक्त
पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात कुपोषणामुळे बाल मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकारच्या घटना नवी मुंबईत होऊ नये, म्हणून नवी मुंबई पालिकेकडून पावले उचलली गेली आहेत. तुर्भे येथील माता-बाल रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्थापन झाल्याने शहरातील बेघरांना फायदा होणार आहे.
-----------------------------------
तुर्भे येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. इतर पालिका रुग्णालये, इतर ठिकाणी कार्यावर असलेले डॉक्टर अशा प्रकारची बालके पाठवतात. अशा कुपोषित बालकांना दाखल करून या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत.
- डॉ. महेश पाटील, माता-बाल रुग्णालय, तुर्भे