वाणगाव, ता. १८ (बातमीदार) : ऑगस्ट, सप्टेंबरमधील मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यातील चिकू बागा झोडपून काढल्या आहेत. किनारपट्टी भागात बुरशीजन्य रोगामुळे चिकू फळ पिकाचे नुकसान झाले. वर्षभर केलेल्या बागायतदारांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे, असे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या बातमीची प्रशासनाने दखल घेत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसह डहाणू कृषी विभागातील अधिकारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज (ता. १८) फळबागेत उतरले.
यावर्षीही पावसाने आतोनात नुकसान केले आहे. फायटोप्थोरा पाल्मीव्होरा बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात चिकू फळाचे नुकसान झाले आहे. हिवाळी हंगामासाठी फुल आणि छोटी फळे गळून पडली आहेत. त्यामुळे पुढील दोन हंगामाचे नुकसान झाले आहे. चिकू बागेतील फायटोपथोरा फळगळ रोगाची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञांनी संयुक्त पाहणी केली. या पथकामध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. उत्तम सहाणे आणि तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, मंडळ कृषी अधिकारी जगदीश पाटील आणि उप कृषी अधिकारी किशोरी विशे यांचा समावेश होता.
नुकसानग्रस्त बागांची पाहणी
डहाणूतील जुन्नर पाडा येथील इरफान मर्चंट, शापूर बारी, झरीन कैफर, जांबुगाव येथील अंकुर सावे, कोसबाड येथील मुकेश शहा, तलासरीतील बोरीगाव येथील यज्ञेश सावे यांच्या बागांची पाहणी केली. या दरम्यान चिकू बागांमध्ये फळगळ रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा १४२ टक्के पाऊस जास्त झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. चिकू बागेत विद्यापीठाच्या शिफारशीनुसार विविध बाबींचा अवलंब न केल्याने रोगाचा प्रभाव वाढण्यास मदत झाली, असे पाहताक्षणी लक्षात आले.
कृषी शास्त्रज्ञांची निरीक्षणे :
१. डहाणूमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये सरासरी १५८ मिमीपेक्षा ३७७.१ मिमी पाऊस झाला. हवा आणि जमिनीतील आर्द्रता वाढलेली असून फळगळ रोगाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले.
२. बागेमध्ये पाण्याचा निचरा झाला नसल्याने रोगाला पोषक वातावरण मिळाले.
४. बागांमध्ये दाटीने झाडांची वाढ आढळली. तसेच झाडांची शास्त्रीय दृष्टीने छाटणी व विरळणी झाली नाही.
५. कोकण कृषी विद्यापीठाने फळगळ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेल्या शिफारशीचा अवलंब केला नाही. तसेच जैविक व रासायनिक बुरशीनाशके वापरण्यात आली नाहीत.
६. किड व रोग तीव्रता कमी करण्यासाठी, तसेच झाडांची रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याची शिफारस आहे. मात्र अशा प्रकारे खतांचे व अन्नद्रव्यांचा वापर केल्याचे आढळले नाही.
या योजना राबवाव्यात :
- झाडावर मेटॅलॅग्झील आठ टक्के आणि मॅन्कोझेब ६४ टक्के या मिश्र बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात एक महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. पावसात द्रावण चिकटून राहावे, याकरिता त्यात स्टिकरचा वापर करावा.
- बागेच्या स्वच्छतेबरोबरच ट्रायकोडर्मा हार्जियानम हे जैविक बुरशीनाशक २५० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात झाडाच्या विस्ताराखाली पसरावे. खोडावर व संपूर्ण झाडावर एक टक्का बोर्डो मिश्रणाच्या एक महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या द्याव्यात.
- जुन्या व घनदाट चिकू बागांमध्ये ऑक्टोबरमध्ये मुख्य फांदीची छाटणी आणि विरळणी करावी.
शेतकऱ्यांनी निव्वळ शासकीय भरपाईवर अवलंबून न राहता, कृषी विभागाच्या विविध योजनेत सहभागी व्हावे व चिकूचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.
- अनिल नरगुलवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू
फळगळ रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळे निस्तेज व कडक होतात आणि प्रादुर्भावित फुलकळी वाळलेली दिसते व प्रादुर्भावित चिकू फुलकळी व फळांची गळ होते. विद्यापीठाने शिफारस केलेल्या उपाययोजना फळ बागायतदारांनी आपल्या प्रक्षेत्रावर राबविल्यास फळगळ या रोगाचा अटकाव होण्यास मदत होईल.
- डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.