तलासरीत वीजप्रश्न कायम
गावपाड्यांत वीजपुरवठा वारंवार खंडित; सकारात्मक सुधारणा सुरू
तलासरी, ता. १८ (बातमीदार) : तलासरी तालुक्यामधील वीजप्रश्न कायम आहे. वीज व्यवस्थेत सुधारणा करीत असल्याचे महावितरणमार्फत सांगण्यात येत आहे, तरी गावपाड्यांतील वीज समस्या नागरिकांच्या त्रासाचा विषय बनला आहे. अजूनही अनेक दुर्गम पाड्यांत वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. विशेषतः पावसाळ्यात ट्रिपिंग वाढते. परिणामी संपूर्ण पाडे अनेक तास अंधारात राहतात.
तलासरी तालुक्यातील वीजपुरवठा व्यवस्थेची एकूण ग्राहकसंख्या तब्बल ३०,०२१ इतकी आहे. यात औद्योगिक मीटर ग्राहक ३०२, शेतीधारक ग्राहक ६५५, तर सर्वसामान्य ग्राहक २९,०६४ आहेत. दरमहा महावितरणला सरासरी ३.४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, मात्र अजूनही १.३० कोटी रुपयांची थकबाकी असून, तब्बल ८,०९० ग्राहकांकडे थकीत रक्कम बाकी आहे. तालुक्यातील दोन उच्चदाब ३३ केव्ही वाहिन्या डहाणू १३२ केव्ही पारेषण उपकेंद्रातून येतात. चालू वर्षी आरडीएसएस योजनेअंतर्गत उच्चदाब तारा बदलण्यात आल्या. अनेक गावपाड्यांत जीर्ण तारा बदलून बंच केबल टाकण्यात आल्या आहेत. जुने व पडके खांब बदलून नवीन खांब उभारले गेल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा अधिक स्थिर झाला आहे. सध्या ४० टक्के गावपाड्यांत केबलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
आव्हानात्मक बाजू लक्षात घेता पावसाळ्यात ट्रिपिंग व वीज खंडित होणे ही तालुक्यातील सर्वात मोठी समस्या आहे. वीजचोरीचे प्रकार अजूनही मोठ्या प्रमाणात घडत असून, दरवर्षी सरासरी २७० ते ३१० वीजचोरीचे प्रकार उघडकीस येतात. यामधून पाच ते सहा लाखांचा दंड वसूल केला जातो. थकीत वीजबिलाची वसुली आणि ग्राहकांचा प्रतिसाद ही महावितरणपुढची मोठी डोकेदुखी आहे. तलासरी तालुक्यातील वीजपुरवठा व्यवस्थेत सकारात्मक सुधारणा होत आहेत. नवीन तारा, बंच केबल, खांब बदलणे आणि कॅबलीकरण यामुळे व्यवस्था हळूहळू मजबूत होत आहे. दरम्यान, अजूनही गावपाड्यांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वीज कार्यालयातील अपुरी सुविधा, थकबाकी आणि वीजचोरी ही गंभीर आव्हाने आहेत. ग्राहकांनी वेळेवर बिल भरले आणि प्रशासनाने दुर्गम भागांवर लक्ष केंद्रित केले, तर अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा हा तालुक्यातील प्रत्येक घराघरात वास्तव होईल.
चौकट
कर्मचारी संख्येची कमतरता
वीज कार्यालयातील अडचणीमध्ये महावितरण कार्यालयात तक्रारी नोंदवण्यासाठी ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. कर्मचारी संख्येची कमतरता असल्याने तातडीच्या दुरुस्त्या उशिरा होतात. तालुक्यात ग्राहकांच्या मागणीनुसार मासिक दर युनिटप्रमाणे ३५ लाख युनिट इतक्या वीज पुरवठ्याच्या मागणीनुसार महावितरणकडून वीज देण्यात येत आहे, असे महावितरणकडून म्हटले जाते. असे असताना अपेक्षेप्रमाणे पुरेशी वीज तालुक्यात देण्यास महावितरण विभाग असमर्थ असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे.
कोट
तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच शहरी व ग्रामीण भागात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
- भूपेंद्र धोडी, उपकार्यकारी अभियंता महावितरण अधिकारी, तलासरी
कोट
‘शहरी भागात वीज सुरळीत आहे, मात्र आमच्या गावपाड्यात सतत खंडित पुरवठा होतो. पावसाळ्यात तर अनेक दिवस अंधारात राहावे लागते. जुन्या तारांमुळे व जीर्ण खांबांमुळे वीजपुरवठा खंडित होतो. महावितरणने ग्रामीण भागावरही लक्ष द्यावे व अखंडित वीजपुरवठा द्यावा, ही आमची मागणी आहे.
- वसंत भसरा, वीज ग्राहक तथा सामाजिक कार्यकर्ते