रुग्णसेवेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका, रक्तसंकलन वाहिनी दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) : जिल्ह्यातील हृदयविकारग्रस्त रुग्णांची चिंता आता दूर झाली आहे. ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयाला कार्डियाक ही अत्याधुनिक रुग्णवाहिका मिळाली आहे. सोबतच खेडोपाड्यात पोहोचेल अशी आधुनिक रक्तसंकलन वाहिनीदेखील जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. या दोन्ही अत्यावश्यक रुग्णवाहिन्या जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे आल्याने जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्डियाक रुग्णवाहिकेमुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांना तातडीची मदत मिळेल, तर रक्तसंकलन वाहिनीमुळे दुर्गम भागांपर्यंत रक्ताचा सुरक्षित पुरवठा सहज होईल. यामुळे गरीब व गरजू रुग्णांनाही दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव आणि जीआयसी हौसिंग फायनन्स यांच्या सीएसआर उपक्रमांमधून या दोन्ही वाहिन्या देण्यात आल्या आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १८) या वाहिन्यांना हिरवा झेंडा दाखवून रुग्णांच्या सेवेसाठी त्या जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याकडे सुपूर्त केल्या. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जीआयसीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन साळवी, नूतन सिंह आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अब्दुल बैग, ठाणे जिल्हा दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्तसंकलन वाहिनी सिव्हिल रुग्णालयाला मिळावी, यासाठी डॉ. कैलास पवार यांनी चिकाटीने पाठपुरावा केला होता. ‘सेवा पंधरवडा’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत मिळालेली ही भेट रुग्णांसाठी महत्त्वाची असणार असल्याचे डॉ. अर्चना पवार यांनी सांगितले.
कोट
ही साधने केवळ वाहने नाहीत, तर ती असंख्य जीवांना नवसंजीवनी देणारी साधने आहेत. या सेवाभावी कार्यासाठी आम्ही सर्व मान्यवरांचे कृतज्ञ आहोत. कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्तसंकलन वाहिनी मिळाल्याने ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे