मनोर, ता. १८ (बातमीदार) : पालघर-मनोर-मोखाडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. या रस्त्यावरील वाढत्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या रुंदीकरणाची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रुंदीकरणाचा प्रस्ताव भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून, प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या स्तरावर पडून आहे.
१६० (अ) क्रमांकाचा पालघर-सिन्नर महामार्ग पालघर आणि नाशिक जिल्ह्याला जोडणारा सुमारे २२० किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. पालघर जिल्हा मुख्यालय, तसेच राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामामुळे मस्तान नाका ते पालघरपर्यंतच्या सुमारे २० किमीच्या रस्त्यावर प्रवासी, तसेच अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. कमी रुंदी, तसेच घाट रस्त्यामुळे पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाक्यापासून तोरंगण घाटाच्या हद्दीपर्यंत सुमारे ८७ किमीच्या रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर आहे. कमी रुंदीमुळे दोन वाहने एकाचवेळी जाण्यास अडचण होते. घाट भागातील अरुंद रस्ता तीव्र वळणांमुळे धोकादायक ठरत आहे. वळणांवर वाहनांवर नियंत्रण मिळवताना अडचणी निर्माण होतात. पावसाच्या पाण्याचा निचरा आणि खड्डे बुजवण्याच्या कामातील ढिसाळ नियोजनामुळे महामार्गावरील खड्ड्यांची संख्या वाढली आहे.
पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. पालघर-सिन्नर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रुंदीकरणाच्या कामासह भूमी अधिग्रहणासाठी सुमारे सहाशे कोटींची आवश्यकता भासणार आहे. पालघर-नाशिक दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत वाढ होऊन प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे पालघर-सिन्नर महामार्गावरील अपघात, तसेच मनुष्यहानी रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती, तसेच दीर्घकालीन सुधारणांसाठी नियोजन केले जात आहे. पालघर ते मस्तान नाकादरम्यानच्या २० किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण, तसेच जव्हार फाट्यापासून तोरंगण घाटापर्यंतच्या ८७ किमी लांबीचा महामार्ग १० मीटर रुंदीचा प्रस्ताव भूपृष्ठ मंत्रालयाला देण्यात आला आहे.
देखभाल-दुरुस्तीचे काम
तोरंगण घाटातील भांगेबाबा मंदिर ते विक्रमगडच्या महावितरण कार्यालयापर्यंत ६६ किमीच्या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती महामार्ग विभागाच्या ठाणे उपविभागामार्फत केली जाते. महावितरण कार्यालयापासून पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ४१ किमीच्या रस्त्याची दुरुस्ती-देखभाल महामार्ग विभागाच्या वसई उपविभागामार्फत केली जात आहे.
पालघर-सिन्नर महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. अरुंद रस्त्यामुळे कोंडी, तसेच अपघात वाढले आहेत. नाशिकमधील कुंभमेळ्यातील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्गाचे रुंदीकरण झाले पाहिजे.
- ज्ञानेश पाटील, जिल्हा अध्यक्ष, रस्ते आस्थापना विभाग, मनसे
पालघर मनोरपर्यंतच्या २० किमीच्या महामार्गाचे चौपदरीकरण, तसेच जव्हार फाटा ते तोरंगण घाटापर्यंतच्या महामार्गाचे ११ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तो आता मंजुरी स्तरावर आहे.
- नीलेश जाधव, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग