पालिकेच्या प्रभाग प्रारूप आराखड्यावर सुनावणी
एकाच सूचनेवर अनेक हरकती; जिल्हाधिकारी किशन जावळे यांची उपस्थिती
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या प्रभाग प्रारूप आराखड्यावर गुरुवारी (ता. १८) झालेल्या सुनावणीत मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सुनावणीस जिल्हाधिकारी किशन जावळे प्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे एकाच मुद्द्यावर अनेकांनी हरकती मांडल्यामुळे या प्रक्रियेला गती मिळाली.
महापालिका हद्दीत एकूण २० प्रभाग असून, ७८ नगरसेवकांची संख्या निश्चित आहे. त्यापैकी १८ प्रभागांत प्रत्येकी चार व उर्वरित दोन प्रभागांत तीन सदस्यांची तरतूद आहे. २०१७ प्रमाणे हा आकडा कायम ठेवण्यात आला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग प्रारूपात काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. खारघरमधील प्रभाग क्रमांक ४, ५ व ६मध्ये काही भाग वगळण्यात आल्याने खारघर फोरमकडून यावर तीव्र हरकती नोंदवण्यात आल्या. लीना गरड, मधू पाटील व बालेश भोजने यांनी यासंदर्भात मुद्दे उपस्थित केले. याशिवाय प्रभाग क्रमांक १, २ व ३ वरही सूचना देण्यात आल्या. कामोठे वसाहतीतील प्रभाग ११ व १२मध्ये काही सेक्टर परस्परांना जोडल्यामुळे स्थानिकांकडून आक्षेप नोंदवला गेला. कळंबोली कॉलनीतील प्रभाग क्रमांक ८ मधील काही सोसायट्या प्रभाग क्रमांक ७मध्ये जोडल्याने शेकाप युवानेते दीपक पाटील यांनी हरकत घेतली. त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमाती घटकांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी सूचना ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी मांडली.
.................
हरकतींचा पाऊस
या सुनावणीत सुमारे २८२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांची संख्या यात लक्षणीय होती. काही जणांचे आधारक्षेत्र अन्य प्रभागांना जोडल्याने त्यात नाराजी दिसून आली. काही विरोधकांनी राजकीय आरोपांसह हरकती मांडल्या.
.............
सुनावणीची काटेकोर व्यवस्था
जिल्हाधिकारी जावळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सुनावणीत नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्था करण्यात आली होती. संबंधितांना निवडणूक विभागाने टोकन दिले होते. तीन स्तरांवर तपासणी करूनच हरकत नोंदवणाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे प्रक्रिया अत्यंत शांततेत पूर्ण झाली.
...............
स्थानिकांचा आवाज
कळंबोली येथील प्रभाग क्रमांक ८ मधील काही भाग प्रभाग ७मध्ये, तर प्रभाग ९ मधील काही भाग प्रभाग ८मध्ये जोडण्यात आले आहेत. हे भौगोलिकदृष्ट्या विसंगत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काटछाट न करता प्रशासनाने आमच्या सूचनांचा आदर करून प्रभाग ८ व ९ जैसे थे ठेवावेत, अशी मागणी दीपक (बंटी) पाटील यांनी सुनावणीत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.