गोळीबार प्रकरणातील आरोपीला १४ वर्षांनंतर अटक
ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी
अंबरनाथ, ता. १७ (बातमीदार) : शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर २०११ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला (वय ५१) असून, त्याला गुजरातमधील सुरत येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
२३ नोव्हेंबर २०११ रोजी रात्री आठ वाजता, वाळेकर हे अंबरनाथ पूर्वेतील शिवसेना शाखेत पक्षकार्यासाठी आले होते. याच दरम्यान दोन इसम शाखेत शिरले आणि त्यांनी रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. यामध्ये वाळेकर यांचे अंगरक्षक शामसुंदर यादव यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या अंगरक्षक राकेश यादवने प्रत्युत्तरात गोळीबार करत एका हल्लेखोराला जखमी केले. तर मनिष कुमार उर्फ बबलु झा-शर्मा हा हल्लेखोर गोळीबारात ठार झाला. या प्रकरणात आधीच काही आरोपींना अटक झाली होती. बबुसिंग उर्फ नंदलाल शहा, ब्रिजेश सिंग, प्रदीप जावरेकर, राजेश सिंग उर्फ गोरखनाथ सिंग यांना अटक करण्यात आली होती; मात्र भैय्याजी शुक्ला गेली १४ वर्षे फरार होता.
ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलीस हवालदार दादासाहेब पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा ठावठिकाणा शोधला. विविध राज्यांतून मोबाईल क्रमांक गोळा करून विश्लेषण करण्यात आले. गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपी सुरतच्या पलसाना भागात असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या परवानगीनंतर पथक सुरतला रवाना करण्यात आले आणि आरोपीला अटक करण्यात आली.
अटकेमुळे १४ वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय आणि हिंसक गुन्ह्याचा एक महत्त्वाचा अध्याय आता पूर्ण झाला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.