मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

प्राचार्य सतीश पोरे यांना शतकवीर पुरस्कार
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा शतकवीर पुरस्कार यंदा पेण येथील ज्येष्ठ प्राचार्य सतीश पोरे यांना प्रदान करण्यात आला. लातूर येथे झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करताना त्यांच्या विज्ञान विषयातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. प्राचार्य पोरे हे विज्ञान विषयाचे प्राध्यापक असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले आहेत. महाविद्यालयीन स्तरावर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनेक प्रयोग, व्याख्याने आणि जनजागृती उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांच्या मनातून गैरसमज, अंधश्रद्धा व अवैज्ञानिक विचार दूर करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारी सदस्य असून ग्रामीण भागात, शाळा-कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रचार-प्रसार केला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच समाजमनातील अंधश्रद्धेविरुद्धची लढाई सतत चालविल्यामुळे त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. या सन्मानामुळे प्राचार्य पोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विद्यार्थ्यांपासून शिक्षक, समाजातील विविध घटकांनी त्यांचे कौतुक केले आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याला केवळ मान्यता नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
............
"स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान"चा शुभारंभ
तळा (बातमीदार) : प्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान, या विशेष आरोग्य मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा माधुरी घोलप यांच्या हस्ते करण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र मोघे, डॉ. संदीप होनसांगडे यांच्यासह आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या व अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम देशभर राबविली जात आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, विविध आजारांचे प्राथमिक निदान करणे आणि मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून देणे आहे. या अंतर्गत स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग तपासण्या, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन व सिकलसेल तपासणी, क्षयरोग तपासणी, तोंडाचा कर्करोग निदान, माता-बालकांचे लसीकरण, रक्तदान शिबिरे, पोषण व मासिक पाळीतील स्वच्छता यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या अभियानामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन उपचार करण्यास मदत होईल. स्वस्थ नारी – निरोगी परिवार, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या उपक्रमाची मोठी भूमिका असेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
...........
आयन एक्सचेंज कंपनीला शिवसेनेचा इशारा
रोहा (वार्ताहर) : धाटाव एमआयडीसी येथील नव्याने सुरू झालेल्या आयन एक्सचेंज (इंडिया) लिमिटेड कंपनीत स्थानिक युवकांना डावलले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. उच्चशिक्षित असूनही स्थानिक युवकांना रोजगार नाकारल्यामुळे रोहा तालुक्यात असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख नितीन वारंगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कंपनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. स्थानिक युवकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. रोहा तालुक्यातील असंख्य पात्र तरुण-तरुणींना रोजगारापासून वंचित ठेवणे हा अन्याय असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले. रोजगाराचा हक्क हिरावून घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत कंपनी व्यवस्थापनाला अल्टीमेटम देण्यात आला. या वेळी सचिन फुलारे, मंगेश जाधव, नंदकुमार बामुगडे, राजेश काफरे, प्रीतम देशमुख, रोहिणी गोसावी, अमृता साळुंखे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
........
स्मार्ट मीटरविरोधात शिवसेनेचा संताप
रोहा (वार्ताहर) : रोहा शहर व ग्रामीण भागात विज वितरण कंपनीकडून जुन्या मीटरांच्या जागी सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्मार्ट मीटरमुळे जादा व अन्यायकारक वीजबिलांचा धोका असल्याची भीती ग्राहकांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तालुका प्रमुख नितीन वारंगे यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी विज कंपनीने जर सक्ती कायम ठेवली तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या अडचणी व भीती शिवसेनेकडे मांडल्या होत्या. त्यावर कारवाई करत शिवसैनिकांनी कार्यालयावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी दीपक तेंडुलकर, सचिन फुलारे, मनोज तांडेल, राजेश काफरे, दुर्गेश नाडकर्णी, ॲड. प्रेरित वलीवकर यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
...............
राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते योगेश भगत शिंदे गटात
रोहा (वार्ताहर) : तालुक्यातील बोरघर गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते योगेश भगत यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला. योगेश भगत हे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या पाठीशी गावातील तसेच विभागातील तरुणांचा व ज्येष्ठांचा मोठा समुदाय आहे. गावाच्या विकासासाठी शिवसेनेच्या झेंड्याखालीच काम करावे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून आगामी पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला थेट फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. उप तालुकाप्रमुख संदेश मोरे, रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर, युवा पदाधिकारी सिद्धांत भुतकर, सार्थक जाधव आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

Thane News: ठाण्याच्या नो एंट्रीमुळे पनवेल कोंडीत! १८ तासांच्या बंदीने घुसमट, वाहतूकदारांना फटका

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

H-1B Visa: ट्रम्प यांच्या 'व्हिसा'प्रकरणावर भारताची पहिली प्रतिक्रिया; ‘कुटुंबांसाठी हे एक संकट...’

SCROLL FOR NEXT