विरार (बातमीदार) : वसई तालुक्यात सोमवार (ता. २२)पासून नवरात्रोत्सवाची धामधूम रंगणार आहे. दुर्गामातेच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या वर्षी तालुक्यात तब्बल दोन हजार १३१ दुर्गामूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यात ५६१ सार्वजनिक, तर एक हजार ५७० खासगी मूर्तींचा समावेश आहे. तसेच २९७ प्रतिमांचे पूजन, तीन हजार ३७२ घटस्थापना आणि तब्बल ७६५ ठिकाणी गरब्यांची रंगतदार मेजवानी होणार आहे.
यंदा नवरात्रोत्सवात पावसाचे सावट कायम असले, तरीही भक्तांचा उत्साह ओसरण्याऐवजी वाढलेला दिसत आहे. सोमवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर तालुक्यातील सार्वजनिक मंडळे, तसेच घरा-घरांमध्ये देवीच्या स्वागताचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. गणेशोत्सवानंतर मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून, या काळात देवीच्या भक्तीचा महिमा गायला जातो. वसई तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांवरदेखील नवरात्र महोत्सव व गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवात सर्वाधिक आकर्षण असते ते गरबा नृत्याचे. त्यामुळे बाजारपेठेत घागरा-चोळी, टिपऱ्या व विविध वेशभूषा साहित्याची विक्री जोरात सुरू आहे. विशेषतः नवरात्रोत्सव काळातील वेशभूषा स्पर्धा व गरबा खेळासाठी तरुणाईत उत्साह ओसंडून वाहत आहे.
सध्या देवीपूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी बाजारपेठेत दिसत आहे. रविवारी (ता. २१) ही गर्दी आणखी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.
मंडळांना देवी पावली!
यावर्षी निवडणुकीचे पडघम वाजल्याने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना देवी पावल्याचे बोलले जात आहे. पाच वर्षांत निवडणुका लांबणीवर पडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने मंडळांना मदतीचा हात भावी नगरसेवकांनी आखडता घेतला होता, परंतु आता मात्र डिसेंबर अथवा जानेवारीत निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने आपल्या प्रभागातील नवरात्रोत्सव मंडळांना भावी नगरसेवकांनी सढळ हस्ते मदतीचा हात दिल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.