उरणमध्ये आजपासून आदिशक्तीचा जागर
चिरनेर गावात साकारणार साडेतीन शक्तिपीठांचा देखावा
उरण, ता. २१ (वार्ताहर)ः आदिशक्तीचा जागर आजपासून देशभरात सुरू झाला आहे. नऊ दिवस देवीच्या आराधनेची तरुणाईमध्ये मोठी उत्सुकता आहे. याच अनुषंगाने उरणमधील मंदिरे, बाजारपेठा सज्ज झाल्या असून ८५ सार्वजनिक मंडळ, खासगी ८७ मूर्तींसह गावोगावी ग्रामदैवतेबरोबर कुलदैवतेच्या घटांची स्थापना होणार आहे.
उरण परिसरात आई जगदंबेची विविध मंदिरे आहेत. त्यापैकी करंजा येथील द्रोणागिरी देवी, उरण शहरातील उरणावती देवी, डोंगरीची अंबादेवी, नवीन शेवामधील शांतेवरी देवी, जसखार येथील रत्नेवरी देवी, फुंडेतील घुरबा देवी, कळंबुसरेत इंद्रायणीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान आणि मोरा येथील एकवीरा देवी, पीरवाडी येथील मागीण देवी, डोंगरी येथील अंबादेवी अशा देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान देवीचा जागर केला जातो. भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून प्रचलित असल्याने उरणकरांची अपार श्रद्धा आहे. देवीवरील याच श्रद्धेमुळे नवरात्रोत्सव काळात देवींच्या विविध मंदिरांत भावकांची गर्दी होणार आहे.
़़़़़़़़़़़़़ः------------------------------------------
उत्सवाची जय्यत तयारी
उरण तालुक्यात विविध मंडळांकडून ऐतिहासिक, पौराणिक कथांवर आधारित आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे आकर्षक देखावे उभारण्यात येणार आहे. चिरनेर गावातील शिवसेनाप्रणित नवरात्रोत्सव मंडळाने साडेतीन शक्तिपीठांचा देखावा उभा करण्याचा मानस आखला आहे. तर उरण शहरात कालिकामातेचा देखावा उभारण्यात येणार आहे. याचबरोबर रास-गरबा नृत्याबरोबरच विविध सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आकर्षण राहणार आहे. त्यामुळे तालुक्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.