माऊंट मेरी जत्रेचा उत्साह शिगेला
जत्रेच्या अंतिम टप्प्यात आबालवृद्धांची अलोट गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः वांद्र्यातील प्रसिद्ध माऊंट मेरी किंवा मोतमाउली जत्रा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे जत्रेत येणाऱ्या आबालवृद्धांची गर्दीही वाढत चालली आहे. रविवारी शेवटचा दिवस असल्याने ही गर्दी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
माऊंट मेरी जत्रेला मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात. लहान मुले, वृद्धांसह तरुणाई मोठ्या संख्येने येतात. शनिवारी (ता. २०) जत्रा समाप्तीच्या आदल्या दिवशी सकाळपासून मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. चर्चच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी मुख्य द्वारापासून रांगा लागल्या होत्या, दर्शनासाठीही मोठी गर्दी होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त होता.
मदर मेरीची सेवा
दिव्यांग असलेल्या नताली गेल्या ३० वर्षांपासून येथे मेणबत्ती, हार विकण्याचा व्यवसाय करतात. याला त्या मदर मेरीची सेवा म्हणतात. बालपणापासूनच ही सेवा करीत असल्याचे सांगतात. माऊंट मेरी जत्रेव्यतिरिक्त दर बुधवारी माहीम चर्च येथेही मेणबत्ती आणि फुलांच्या विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचेही नताली सांगतात.
इमारतसदृश मेणबत्यांची मागणी
वसीम शेख हे २५ वर्षांपासून माऊंट मेरी चर्च येथे स्टॉल लावतात. या आधी त्यांना पालिकेकडून मोफत स्टॉलची परवानगी होती; परंतु आता आठवडाभरासाठी आठ हजार रुपये मोजावे लागत आहेत. ही जास्त रक्कम असल्याची खंत शेख यांनी बोलून दाखवली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लहान मेणबत्त्यांना अधिक मागणी आहे; परंतु काही मदर मेरीला नवस बोलण्यासाठी काही विकसकांनी विशेष मागणी करून इमारतसदृश मेणबत्त्या मागवल्याचे त्यांनी सांगितले.
मोफत सरबतवाटप
या जत्रेला चार दशकांपूर्वी कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या. अनेक भाविक नवस पूर्ण करण्यासाठी दूरवरून पायी येत. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोयही नसे. त्यामुळे भाविकांची पाण्याची सोय व्हावी, यासाठी मिस फनुसावाला या जवळपास ५० वर्षांपासून समाजसेवा म्हणून मोफत पाणी वाटप करतात. यावर्षी पाण्यासोबतच सरबताचेही वाटप करीत आहेत.
खाद्यपदार्थ, खेळणींवर उड्या
माऊंट मेरीची जत्रा खाद्यसंस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. विविध मिठाईसह गोवा, दिल्ली, हरियाना, महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांवर गर्दी करून पदार्थांवर ताव मारताना तरुणाई दिसते. दुसरीकडे बच्चे कंपनी पालकांना फुगे, खेळणी, जत्रेतील आकर्षण असलेली पिपाणी घेण्यासाठी हट्ट करतात. वयोवृद्धही मोठ्या संख्येने येथे येतात. निवृत्त लष्कर अधिकारी वसंत चौघुले (८०) आपल्या पत्नी, मुलांसह जत्रेत आले होते. दरवर्षी जत्रेला आवर्जून भेट देत असल्याचे चौघुले सांगतात.
वाहतूक कोंडीची समस्या
माऊंट मेरी जत्रेमुळे आधीच गजबलेल्या या परिसरात आणखी गर्दी होते. परिणामी, येथे सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. वांद्रे रेल्वेस्थानक ते माऊंट मेरी चर्च अशी विशेष बससेवा चालवूनही भाविकांच्या गर्दीपुढे ती सेवा कमी पडते. अशावेळी स्थानिक रिक्षाचालकांकडून भाविकांची लूट केली जाते. तर खासगी वाहनांची त्यात वाढ झाल्यामुळे वांद्रे स्थानक ते माऊंट मेरी चर्च हा जवळपास सात किलोमीटरच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात असूनही प्रमाणापेक्षा जास्तीच्या वाहनांमुळे परिस्थिती हाताबाहेर जाते.
चोरीच्या घटना
गेल्या काही दिवसांत या परिसरात गर्दीचा फायदा उचलत मोबाईल व पाकीट चोरीच्या घटना घडल्यामुळे भाविक व पोलिस दोन्ही सतर्क झाले आहेत. अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.