भांडुप संकुल, तानसा येथे १० हजार ४३८ झाडांची पुनर्लागवड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः मुंबई महानगरपालिका भांडुप संकुल येथे दोन हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारत आहे. या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार २३५ झाडे बाधित झाली आहेत. यापैकी एकूण ४३८ झाडांची पुनर्लागवड भांडुप संकुल परिसरात यशस्वीपणे करण्यात आली आहे, तर उर्वरित ८३५ झाडांची भरपाई म्हणून ११ हजार ४४३ झाडे तानसा तलाव परिसरात नव्याने लावली जात आहेत.
यापैकी सुमारे १० हजार झाडांची लागवड तानसा तलाव पायथ्याशी करण्यात आली आहे. भांडुप संकुलातील झाडे पुनर्लागवडीचे लक्ष्य १०० टक्के पूर्ण करण्यात यश आले आहे. पालिकेच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.
भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल हे आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या प्रकल्पाची एकत्रित पाणी शुद्धीकरणाची क्षमता प्रतिदिन २,८१० दशलक्ष लिटर इतकी आहे. भांडुप येथे प्रतिदिन अनुक्रमे सुमारे १,९१० दशलक्ष लिटर आणि ९०० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करू शकणारी दोन युनिट्स आहेत. पाणीपुरवठ्याची मागणी वाढत असल्याने भांडुप संकुल येथे दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. या नवीन जलशुद्धीकरण केंद्रामुळे एकूण एक हजार २३५ झाडे बाधित झाल्याने त्यांच्या पुनर्लागवडीची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे.
पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. भांडुप संकुलातील झाडांच्या यशस्वी पुनर्लागवडीमुळे आपली हरित परंपरा मजबूत झाली आहे. झाडांच्या पुनर्लागवडीत ‘रूट बॉल’ सारख्या शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यामुळे झाडे जगण्याचा दर शंभर टक्के मिळवणे शक्य झाले आहे. महापालिकेकडून पुनर्लागवड केलेल्या झाडांची नियमित निगा राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. झाडांना आवश्यक पाणीपुरवठा, छाटणी, खतांचा वापर आणि संरक्षणात्मक उपाययोजना वेळोवेळी करण्यात येत आहेत. पालिकेची पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची वचनबध्दता असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले.