नवरात्रोत्सवात देवीला साजेसा अलंकार
आज घटस्थापना; मोतीच्या माळा, मुकुट, कर्णफुलांना मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची खरेदी अखेरच्या टप्प्यात आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी देवीची आकर्षक मूर्तीची स्थापना सोमवारी (ता. २२) करण्यात येणार आहे. देवीच्या सजावटीसाठी बाजारपेठांमध्ये भक्तांची लगबग सुरू आहे. देवीला आभूषणांनी नटवावे, या हेतूने तिचा अलंकार खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये गर्दी झाली आहे. दादर, भूलेश्वर, क्रॉफर्ड मार्केड मुंबईतील हे महत्त्वाच्या बाजारपेठा भक्तांनी भरल्या आहेत.
देवीच्या मूर्तीकडे पाहिल्यावर साक्षात देवीच समोर उभी आहे, असे वाटावे, देवीची शोभा आणखी वाढावी, यासाठी अलंकारांनी मूर्तीला सजवले जाते. यंदा ही वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण भुलेश्वर येथील बाजारात उपलब्ध असून, खरेदीसाठी भक्तांची गर्दी उसळली आहे. नवरात्रोत्सव आता एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी, खरेदीसाठी तुडंब गर्दी पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात नवरात्रोत्सवात भक्तिभाव, उत्साह आणि परंपरा असे चित्र असते. नऊ दिवसांत देवीची विविध स्वरूपांत पूजा अर्चा केली जाते. देवीसाठी पाच फुटांपर्यंत मोतीच्या माळा, मुकूट, कंबर पट्टा खरेदीसाठी भुलेश्वर येथील बाजारात भक्तांची गर्दी उसळली आहे. सहा इंच ते पाच फुटांपर्यंतच्या माळा, बांगड्या, मुकुट, कर्णफुले खरेदीसाठी भक्त मुंबईतून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भुलेश्वर येथील बाजारात येत असतात.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळासह घरोघरी देवाच्या स्वागताची लगबग सुरू असून, सजावटीसाठी भक्तांची एकच धावपळ उडाली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात विविध आकर्षक देखावे तयार साकारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, देवीच्या अलंकार खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली आहे. देवीला परंपरेनुसार सोन्याचे दागिने, मोत्यांची माळ, पैंजण, कर्णफुले, नथ, वंकी, गजरा, कंबरेवर पट्टा असे विविध अलंकार परिधान केले जातात. काही ठिकाणी देवीला हिरा-माणिकांनी जडित दागिन्यांनी सजवले जाते, तर ग्रामीण भागात चांदीचे व पारंपरिक सोन्याचे अलंकार वापरले जातात. गजरा, फुलांची वेणी देवीच्या रूपात भर टाकतात.
प्रत्येक अलंकाराचे वेगळे धार्मिक महत्त्व आहे. नथ ही मंगलकारकतेचे प्रतीक मानले जाते, तर कर्णफुले ऐकण्यात शुद्धता आणि ज्ञानाचे द्योतक ठरतात. कंबरेवरील पट्टा म्हणजे शक्तीचे प्रतीक, तर गळ्यातील हार भक्तांचा अखंड स्नेह आणि भक्तीचे द्योतक समजला जातो. सोन्याचे अलंकार समृद्धीचे, तर चांदीचे अलंकार पवित्रतेचे प्रतीक मानले जातात, मात्र सोने-चांदीचे आभूषण देवीच्या श्रुंगारात अपर्ण करणे शक्य नसल्याने अनेक भक्त तयार आभूषणे खरेदी करतात. मुंबईतील भुलेश्वर येथील दुकानात अलंकार खरेदीसाठी भक्तांची गर्दी उसळली असून, मोतीच्या माळांना भक्त पसंती देतात.
आकारानुसार दर
सोनेरी रंगाचा मुकुट - २०० रुपये ते १० ते १२ हजारांपर्यंत
पाच ते सहा फुटांचे हार - ४,८०० रुपये
मोत्यांचा हार - १२० रुपयांपासून सुरू