नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : मसाल्याच्या व्यवसायातील गुंतवणुकीतून दरमहा तीन टक्के नफा देण्याच्या प्रलोभनातून पाच जणांची ३३ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी साताऱ्यातील चंद्रशेखर शिंदेवर (३८) गुन्हा दाखल केला आहे.
वाशी सेक्टर-२६ मध्ये राहणाऱ्या वंदना विश्वासराव (४७) यांची फलटणच्या तामखडा गावचा रहिवासी चंद्रशेखर शिंदेशी ओळख होती. एपीएमसीतील मसाला मार्केटमध्ये मसाल्याचा मोठा व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के नफा देण्याचे प्रलोभन दाखवून पैसे टाकण्यास प्रवृत्त केले होते. मार्च २०२४ मध्ये वंदना यांनी तीन लाख रुपये रोख, १२ लाख रुपये किमतीचे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गुंतवणूक करण्यासाठी दिले होते. मे २०२४ मध्ये शिंदे याने पुन्हा त्यांच्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले. सुरुवातीला दोन महिन्यांत नफा म्हणून ९० हजार रुपये दिले, मात्र नफ्याची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. कराराची मुदत संपल्यानंतरदेखील शिंदे याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर वंदना यांनी चंद्रशेखर शिंदेची माहिती काढली असता, अशाच पद्धतीने आणखी काही नागरिकांनाही फसवल्याचे निदर्शनास आले.
-----------------------------
एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार
मंगला चव्हाण (सात लाख ), संदीप चव्हाण (दोन लाख), रमेश पिसाळ (दोन लाख), स्वाती बंडगर (पाच लाख) चौघांचा समावेश असल्याचे आढळून आले. चंद्रशेखर शिंदेने पाच जणांकडून ३३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.