‘सामाजिक माध्यमांच्या युगात पालकांनी जागरूक राहिले पाहिजे’
प्रभादेवी, ता. २१ (बातमीदार) : सध्याचे युग हे सामाजिक माध्यमांचे आहे. प्रत्येक जण सामाजिक माध्यमांवर सक्रिय आहे. अशातच सोशल मीडियावरील फसवणुकीच्या गुन्ह्यातही वाढ होताना दिसून येत आहे. फसवणुकीच्या जाळ्यांतून स्वतःचा बचाव करायचा असेल तर प्रत्येक पालकाने जागरूक राहिले पाहिजे, असे मार्गदर्शन वरळी सायबर विभागाचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश हेंबाडे यांनी केले.
शिवाजी विद्यालय आणि अभ्युदयकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘सायबर क्राईम’ या संवेदनशील ज्वलंत विषयावर पोलिस उपनिरीक्षक नितीन हेंबाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस अधिकारी संजय गोविलकर, डॉ. जगन्नाथ हेगडे, डॉ. किशोर खुशाले, अधिराज लोकेगावकर, शेखर छत्रे, सोनल खानोलकर आदी उपस्थित होते.
सामाजिक माध्यमांचे जितके फायदे तितके तोटेदेखील आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. या माध्यमांतून फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे, अनेक तक्रारी दररोज पोलिस ठाण्यात येत असतात, असे नीलेश हेंबाडे यांनी सांगितले. लग्न मोडतात, धमक्या देऊन पैसे उकळले जातात, शारीरिक अत्याचार केले जातात, त्याचे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत पैसे उकळले जातात, असे त्यांनी सांगितले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सामाजिक माध्यमांबाबत साक्षरता निर्माण करायला हवी, असे नीलेश यांनी सांगितले.