आगामी निवडणुकीत शरद पवार गट ताकदीने उतरेल ः नोवेल साळवे
कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : आगामी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याची माहिती माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी बुधवारी (ता. १७) दिली.
शरद पवार गटाच्या श्रेष्ठींनी व्यवस्थित रूपरेषा तयार केली असून, पुन्हा एकदा शरद पवार गटाचा महापौर पालिकेवर बसू शकतो. पक्षाचा उद्देश हा केवळ जनसेवा आहे. मतदारराजाने योग्य भूमिका बजावली, तर शरद पवार गटाला कोणीही सत्तेपासून दूर ठेवू शकणार नाही, आम्ही जनतेच्या सर्व प्रलंबित प्रश्नांचे समाधान काढण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे साळवे यांनी सांगितले.
सत्तेत आल्यावर उत्तम मोफत आरोग्यसेवा पुरविणारे दवाखाने, महापालिका हद्दीत चांगले रस्ते, स्वच्छ पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर करणे, महापालिका प्रशासनामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालणे या सर्व गोष्टी करण्यासाठी मतदारराजाने आणि जनतेने आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन साळवे यांनी केले आहे.