मध्यस्थीमुळे वाद मिटवणे अधिक श्रेयस्कर : न्यायाधीश काफरे
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : वि-संवादाकडून सुसंवादाकडे जाण्यासाठी मध्यस्थी ही काळाची गरज आहे. न्यायालयीन खटल्यांत वेळ, पैसा व शक्ती खर्च करण्यापेक्षा सामंजस्याने तोडगा काढणे समाजहिताचे ठरते, असे प्रतिपादन बेलापूर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांनी केले.
कौटुंबिक न्यायालय बेलापूर, तालुका विधी सेवा समिती बेलापूर आणि नवी मुंबई वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी बेलापूर येथील कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायाधीश काफरे होते. या वेळी व्यासपीठावर न्यायाधीश ओंकार साने, न्यायाधीश आर. व्ही. पाटील, ॲड. कृष्णा ठक्कर आणि नवी मुंबई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुनील मोकल उपस्थित होते. या वेळी बोलताना न्यायाधीश काफरे म्हणाले की, कायदेशीर पद्धतीने विवाहबद्ध झालेले पती-पत्नी जेव्हा न्यायालयीन प्रक्रियेत येतात, तेव्हा वैवाहिक वाद मिटवण्यासाठी वर्षानुवर्षे खटला चालवण्याऐवजी मध्यस्थीद्वारे सामोपचाराने निर्णय घेणे अधिक योग्य ठरते. या वेळी न्यायाधीश ओंकार साने यांनी वाद निर्माण होण्यामागील सामाजिक व मानसिक कारणांवर प्रकाश टाकत मध्यस्थीची सविस्तर माहिती दिली. न्यायाधीश आर. व्ही. पाटील यांनी “वैकल्पिक वाद निवारण” या संकल्पनेचा आढावा घेत मध्यस्थीचे फायदे व तोटे स्पष्ट केले. ॲड. कृष्णा ठक्कर यांनी मध्यस्थी प्रक्रियेतील टप्प्यांची माहिती देताना, सर्व विधीज्ञ हे मेडिएटर नसतात, तसेच समुपदेशन व मध्यस्थी यात मूलभूत फरक आहे, यावर विशेष भर दिला. या वेळी नवी मुंबई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुनील मोकल यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बेलापूर न्यायालयातील कार्यरत विधीज्ञांचा सन्मान न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश ओंकार साने, न्यायाधीश आर. व्ही. पाटील, विवाह समुपदेशक भारत काळे आणि ॲड. कृष्णा ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मनीषा बंडगर यांनी केले तर आभारप्रदर्शन कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक गणेश हिरवे यांनी केले.