मुंबई

अफवांचा बाजार हेतुपुरस्सर?

CD

अफवांचा बाजार हेतुपुरस्सर?
सातत्याने घात होण्याची पोलिसांना चिंता
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः इथे बॉम्ब, तिथे बॉम्ब या सतत येणाऱ्या अफवांमुळे संबंधित आस्थापनेसह पोलिसांवर प्रचंड ताण पडतो. सध्या या ताणापेक्षा लांडगा आला रे आला, या गोष्टीप्रमाणे तर गत होणार नाही, याची चिंता पोलिस दलाला अधिक सतावते आहे. त्यासोबत हेतुपुरस्सर अशा अफवा पसरवून पोलिसांचा प्रतिसाद तर अभ्यासला जात नाही, अशी शक्यता शुक्रवारी (ता. १९) मुंबई उच्च न्यायालयाला प्राप्त ई-मेलसह गेल्या दीड वर्षांत तीनशेहून अधिक अतिरेकी कृती, बॉम्बस्फोट किंवा मान्यवर व्यक्तीच्या हत्येबाबत अफवांचे कॉल, मेसेज, ई-मेल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह विविध शासकीय, खासगी आस्थापनांना प्राप्त झाले आहेत. विमानतळानंतर वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे सर्वाधिक अफवा पसरविण्यात आल्या.
या प्रत्येक प्रकरणात पोलिसांनी नियमित कार्यप्रणाली वापरून संबंधित आस्थापनेची झाडाझडती घेतली. संशयास्पद काहीही न आढळल्याने सर्वच धमक्या अफवा ठरल्या. त्यानंतर प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदवून तपास केला. यातील अनेक प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला गोवण्यासाठीची सूडबुद्धीही आढळली, काहींनी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला तर काही मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांना आढळले.
एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेनुसार अशाप्रकारचा प्रत्येक ऑन रेकॉर्ड संदेश (मेल, मेसेज, कॉल) दुर्लक्षिला जात नाही. प्रत्येक संदेशाची कार्यप्रणालीनुसार खातरजमा होते. ही अफवा आहे हे वरकरणी दिसत असले तरी खातरजमा करावीच लागते. त्यात हयगय होत नाही; मात्र सतत म्हणजे अगदी एक दिवस आड असे संदेश प्राप्त होणे ही अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे. पोलिस किती तत्परतेने असे संदेश हाताळतात, किती वेळात संबंधित आस्थापनेत पोहोचतात, काय कार्यप्रणाली वापरतात, ही हेतुपुरस्सर अभ्यासले जाऊ शकते. त्यामागे शत्रूराष्ट्र, अत्रे संघटनांचे पाठीराखे असू शकतात.
सततच्या अफवांमुळे पोलिसांकडून कधीतरी हयगय होऊ शकते. त्यात दोष पोलिसांचा नाही. तेही इतरांप्रमाणे माणूस आहेत आणि त्यांचे नियमित काम तणावपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. दीप्ती पुराणिक नोंदवतात. डॉ. पुराणिक न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ आणि या विषयातील सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांचाच मुद्दा अधोरेखित करून एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, ही हयगय सतत धमकीचे संदेश प्राप्त होणाऱ्या आस्थापनेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही होऊ शकते. संदेशाची माहिती देणे किंवा विलंबाने देणे या कृती घडू शकते.
मुंबईसह देशाला अशाप्रकारे अस्थिर ठेवण्याचा तर हा प्रयत्न नाही, या दृष्टीनेही या अफवांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्य एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने नोंदवली.

असा पडतो ताण
- शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ तुटपुंजे आहे. प्रशासकीय कामे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, प्रतिबंधात्मक कारवाया आणि बंदोबस्त या नित्य कामाचा ताण पोलिसांवर असतो. त्यात या अफवांमुळे त्यात भर पडते. खातरजमेसाठीची झाडाझडती, गुन्ह्याची नोंद, तपास आणि खटल्याचे कामकाज पोलिसांना पाहावे लागते.
दुसरीकडे विमानतळ, रेल्वेस्थानके, उच्च न्यायालय, स्टॉक एक्सचेंज, शाळा, महाविद्यालये किंवा अन्य कोणत्याही शासकीय, खासगी आस्थापनेचे परिचालन या अफवांमुळे काही कालावधीसाठी ठप्प पडते. गेल्या आठवड्यात अशा अफवेमुळे उच्च न्यायालयाची इमारत न्यायाधीश, वकील, अशिलांसह संपूर्ण रिकामी करावी लागली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा आणि अशा महत्त्वाच्या आस्थापनांचे मनुष्यतास, मनुष्यबळाचा मोठा अपव्यय होतो.

अलीकडे राग, दुःख या भावनांवर नियंत्रण राखले जात नाही. वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनांचा संबंध जोडून सूड भावनेने किंवा निष्कारण काळजीपोटी अशा कृती केल्या जाऊ शकतात. यंत्रणा वेठीस धरणे, नागरिकांना मनस्ताप घडवणे यात आनंद, समाधान शोधले जाते. दुसरीकडे अनेक प्रकारच्या मनोविकारांबाबत माहितीच नसल्याने त्यावर उपचार होत नाहीत.
- डॉ. दीप्ती पुराणिक, सहायक प्राध्यापक,
एनएमआयएमएस विद्यापीठ, मानस शास्त्रविभाग

अफवांचा वेग
* १९ सप्टेंबर - मुंबई उच्च न्यायालयाला धमकीचा ई-मेल. आठ दिवसांच्या अंतराने प्राप्त ही दुसरी अफवा.
* १७ सप्टेंबर - अंधेरीतील पंचतारांकित हॉटेलला अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबई बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी दिली. तर एक बॉम्ब हॉटेलमध्ये ठेवला आहे, असेही सांगितले.
* १२ सप्टेंबर - दिल्ली आणि उच्च न्यायालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यात तीन न्यायाधीशांच्या न्यायदालनात स्फोट घडविण्याची धमकी देण्यात होती. खबरदारी म्हणून पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाची इमारत रिकामी करून झाडाझडती घेतली.
* ५ सप्टेंबर - अनंत चतुर्दशीला शहरात ३४ मानवी बॉम्बस्फोट होतील, पाकिस्तानी अतिरेकी ४०० किलो आरडीएक्ससोबत भारतात शिरले, अफवा वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावरील मेसेजद्वारे उडविण्यात आली होती. गुन्हे शाखेने ही अफवा पसरवणाऱ्या अशोककुमार नावाच्या तरुणास नोएडा येथून अटक केली. मित्राला गोवण्यासाठी त्याने ही कृती केल्याची कबुली दिली.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

Upper farmer:'उपरीतील शेतकऱ्यांचा बंधाऱ्यावरुन जीवघेणा प्रवास'; कासाळ ओढ्यावर पुलाची मागणी

Kunbi Note: 'साेलापूर जिल्ह्यात कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण'; गाव, आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्र

Palghar Crime: 'बोईसर तारापूर खून प्रकरणातील दोघे आरोपींना अटक'; पोलिसांनी आरोपींना राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरातमधून घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Update : सासवड शहरात बँड पथकाच्या तालावर देखण्या सर्जा राजाची मिरवणूक

SCROLL FOR NEXT